Tuesday, September 09, 2025 07:04:52 PM

Nepal Gen- Z Protest: नेपाळमध्ये हिंसक आंदोलन; मंत्र्यांची घरं जाळली, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील अचानक घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरली असून देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

nepal gen- z protest नेपाळमध्ये हिंसक आंदोलन मंत्र्यांची घरं जाळली राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

Nepal Gen- Z Protest: नेपाळमध्ये सोशल मीडियावरील अचानक घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरली असून देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या निदर्शनांनी आक्रामक वळण घेतले असून राजधानी काठमांडूसह अनेक शहरांत तोडफोड, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

सोशल मीडियावरील 25 हून अधिक प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती. यात एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युबसह अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता. सरकारच्या या निर्णयाने त्रस्त झालेल्या Gen Z पिढीने आंदोलन सुरू केले. पाहता पाहता हा रोष रस्त्यांवर ओसंडून वाहू लागला आणि मोठ्या संख्येने युवक-युवती सरकारविरोधी घोषणाबाजी करत संसद भवनासमोर जमले.

हेही वाचा: Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये सत्तापालटाचे संकट! 3 मंत्र्यांच्या राजीनाम्यांनंतर पंतप्रधान ओली अडचणीत

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने गोळीबार करावा लागला. यात अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडाही वाढत चालल्याचे सांगितले जाते. या कारवाईनंतर जमाव आणखी आक्रमक झाला आणि त्यांनी शासकीय इमारतींसह काही नेत्यांची घरे पेटवून दिली.

दरम्यान, देशातील सततच्या गोंधळामुळे आतापर्यंत दहा मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यात गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचा समावेश आहे. या राजीनाम्यांमुळे सरकारची अडचण आणखी वाढली आहे. आंदोलक आता थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्याचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी उपचारासाठी परदेशी जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा निर्णय मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. खासगी विमान तयार ठेवण्यात आले असून ते कोणत्याही क्षणी देश सोडू शकतात, अशी चर्चा आहे.

हेही वाचा: Nepal Gen- Z Protest: नेपाळमधील हिंसाचारानंतर भारताने उचलले कठोर पाऊल; 'सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये...

हिंसाचार इतका भडकला आहे की राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानीही आंदोलकांनी प्रवेश करून ताबा घेतल्याचे वृत्त आहे. माजी मंत्र्यांचे आणि काँग्रेस अध्यक्षांचे घरही संतप्त जमावाने जाळल्याचे सांगितले जाते. या घडामोडींमुळे नेपाळ सरकारवर दबाव वाढला असून परिस्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

नेपाळच्या राजकारणात स्थिरता कधीच दिसली नाही. लोकशाही आल्यापासून आजवर एकाही पंतप्रधानांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. आता पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेची छाया गडद होत आहे.तरुणाईच्या आंदोलनामुळे संपूर्ण देश ठप्प झाला असून नेपाळच्या सीमा लगतच्या भारतातील जिल्ह्यांमध्येही उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे. सीमेवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.सध्याच्या घडामोडींमुळे नेपाळमध्ये राजकीय पटलावर मोठा भूकंप घडला असून आगामी दिवसांत परिस्थिती कुठे वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री