मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या लखपती दीदी योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर, एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लखपती दीदी योजनेबाबत एक वक्तव्य केलं आहे. 'येत्या काळात महाराष्ट्रात एक कोटी बहीणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही', असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केले.
हेही वाचा: E GramSwaraj: तुमच्या ग्रामपंचायतीचा खर्च तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या एका क्लिकवर
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'येत्या काळात महाराष्ट्रात एक कोटी बहीणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही. लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार विविध योजना ठरवत आहेत. विरोधकांनी कितीही टीका केली तरी महिलांसाठी सुरु केलेली एकही योजना पुढील पाच वर्षांसाठी बंद होणार नाही'.
लखपती दीदी योजना काय आहे?
15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'लखपती दीदी' योजनेची घोषणा केली. या योजनेतून महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. ज्या महिला आर्थिक दृष्ट्या वंचित आहेत, त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी क्रेंद सरकारने 'लखपती दीदी' योजनेची सुरुवात केली.
लखपती दीदी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे
जर तुम्ही लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याजवळ पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, घरचा पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रताचे प्रमाणपत्र, पासबूक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
लखपती दीदी योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहे
प्रत्येक राज्यात लखपती दीदी योजनेची वेगवेगळी पात्रता आणि अटी आहेत. या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करु शकतात. विशेष म्हणजे लाभार्थी योजनेसाठी संबंधित महिला त्या त्या राज्याची रहिवासी असावी. यासह, त्या महिलांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. तसेच, या योजनेसाठी ज्या महिला अर्ज करतील, त्या महिला बचत गटाशी संबंधित असणे गरजेचे आहे.
'या' पद्धतीने महिला होणार लखपती
लखपती दीदी योजनेतून महिलांना विविध प्रकारांचे कौशल्य शिकवण्यात येईल. या कालावधीत, स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना काही टिप्स दिल्या जातील. सोबतच, व्यवसायासाठी महिलांना डिजिटल बँकिंग सर्विस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगची ट्रेनिंगही दिली जाते.