मुंबई : महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदांवरून सत्ताधारी युतीमध्ये सुरू असलेला वाद कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली होती. यानंतर, रायगडमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) नेते भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गावर उतरून थेट रास्ता रोको आंदोलन केले. यादरम्यान, त्यांनी टायर जाळून निषेध नोंदवला. याचप्रमाणे, शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणानंतर, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच थांबवावा लागला. मात्र 12 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यामुळे पालकमंत्रीपदाच्या निर्णयात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा:
या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 12 एप्रिलपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यामध्ये त्यांचा मुख्य दौरा रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भोजनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी येणार:
विशेष बाब म्हणजे, रायगड दौरा पूर्ण झाल्यानंतर अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) खासदार सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. त्यामुळे अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला दुजोरा मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असा असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा:
12 एप्रिल 2025 रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकाळी 10 वाजता पुणे विमानतळावर आगमन करतील. त्यानंतर सकाळी 10:45 वाजता ते पाचाड येथे हेलिकॉप्टर लँड करतील. त्यानंतर, सकाळी 11 ते दुपारी 1 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रायगडावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर, दुपारी 1:30 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाचाडवरून टेक ऑफ करून दुपारी 2 वाजता सुतारवाडी येथील खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन करण्यास येतील. त्यानंतर, दुपारी 3 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईकडे येण्यास रवाना होतील. त्यानंतर, सायंकाळी 4 ते 6 वाजता ते विलेपार्ले येथील चित्रलेखा साप्ताहिकाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सह्याद्री अतिथीगृहात मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 एप्रिल 2025 रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीकडे रवाना होतील.
पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील रस्सीखेच:
गेल्या काही महिन्यांपासून, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अदिती तटकरे आणि शिवसेना (शिंदे गट) नेते भरत गोगावले यांच्यातील रस्सीखेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 'अमित शाह यांच्या हस्तक्षेपामुळे या वादावर तोडगा निघेल', अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेसह राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.