Wednesday, August 20, 2025 01:04:35 PM

मीरा रोडमधील सभेतील भाषणामुळे राज ठाकरे गोत्यात?

भाषा वादावरून राज ठाकरे अडचणीत; हिंदी भाषिकांविरोधात द्वेष पसरवल्याच्या आरोपावर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल, कायदेशीर कारवाईची मागणी.

मीरा रोडमधील सभेतील भाषणामुळे राज ठाकरे गोत्यात

Raj Thackeray: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाषा वाद पुन्हा चांगलाच पेटला आहे. हिंदी भाषा सक्ती आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले आहेत.हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलनाचे सूर छेडले गेले. त्यात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.

मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आयोजित केलेल्या मेळाव्यातही भाषेच्या मुद्द्यावर जोरदार भाष्य केले गेले. त्या वेळी राज ठाकरेंनी अमराठी भाषिकांविरुद्ध थेट इशारा दिला होता. 'महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिका, व्यापारी मस्ती दाखवत असाल तर दणका बसणार,' असा थेट इशारा त्यांनी दिला होता.

हेही वाचा: 'मुंबईत ये दुबे… समंदरात डुबे-डुबे कर मारू'; भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानावर राज ठाकरेंचा स्फोटक प्रत्युत्तर

त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये झालेल्या सभेतही त्यांनी हाच मुद्दा उचलून धरला. परप्रांतीयांनी महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकायलाच हवे, असे ठणकावले. मात्र, त्यांच्या या विधानांवरून राजकीय वातावरण अधिक तापले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कायदेशीर कारवाईची मागणीही पुढे आली आहे.

वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये राज ठाकरे यांनी दिलेल्या विधानांमुळे हिंदी भाषिकांमध्ये द्वेषभावना पसरवण्याचा आणि त्यांच्याविरुद्ध हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्रात भाषा वादातून निर्माण होणारा तणाव वाढण्यास मनसे जबाबदार असल्याचा आरोप या याचिकेत आहे.

हेही वाचा:हिंदी सक्ती केली, तर दुकानेच नव्हे शाळाही बंद करून दाखवेन; राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांकडेही तीन वकिलांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज ठाकरेंच्या विधानांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात आली होती.

या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील भाषा वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज ठाकरेंच्या विधानांमुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होणार का, याकडे 
सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री