मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महत्वाची घोषणा केली. नुकताच, राज ठाकरेंनी मंगळवारी सायंकाळी त्यांच्या 'एक्स'वर स्पष्ट आदेश दिला आहे.
हेही वाचा: निधीची तरतूद कशी करायची मला माहीत आहे; पवारांचा सरकारला इशारा
काय म्हणाले राज ठाकरे?
'एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही', असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
5 जुलै रोजी वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे ठाकरेंचा विजयी मेळावा पार पडला. यादरम्यान, राज ठाकरेंनी 'ठाकरे' शैलीत आपल्या मनसैनिकांना महत्वाचा आदेश दिला. ज्यात राज ठाकरे म्हणाले की, 'मराठी भाषा बोलण्यावरुन वाद घालणाऱ्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ बनवू नका आणि ते कुठे शेअरही करु नका'. यानंतर मंगळवारी सायंकाळी आपल्या 'एक्स' अकाउंटवरुन मनसैनिकांना नव्या सूचना दिल्या.