चिमणीचं घरटं कधीचं पूर्ण होत नाही, तशी परिस्थिती राज ठाकरेंची असल्याचा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला आहे. निवडणुकीपुरतं त्यांचं मराठी प्रेम जागरुक झालंय असेही गोरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात मीरा भाईंदर येथे जाहीर सभा घेतली. भाषण करताना हिंदी भाषा ज्या शाळेत सक्तीची केली जाईल, ती शाळा बंद पाडू असा त्यांनी इशारा दिला होता. त्यावर बोलताना महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांचे मराठी भाषेबाबत प्रेम हे फक्त निवडणुकीपुरते असल्याचे गोरे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, "जसं चिमणी पावसाळ्यात घरटं बांधायचा प्रयत्न करते, पण त्या चिमणीचं घरटं पूर्ण होत नाही. तसंच राज ठाकरेंचं मराठी भाषेच प्रेम फक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीपुरतं आहे. परंतु राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत यशस्वी होणार नाहीत, राज ठाकरे सत्तेपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही असा खोचक टोला जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांना लगावला आहे.