Rohit Pawar Slams Meghana Bordikar: राज्यातील राजकारण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांच्यावर सडकून टीका करत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देताना दिसत आहेत. सरकारी कार्यक्रमात घरकुल लाभार्थ्यांना अपेक्षित प्रमाणात उपस्थित न केल्यामुळे बोर्डिकर यांनी ग्रामसेवकावर थेट सार्वजनिक धमकी दिली, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
ट्विटरवर रोहित पवारांनी म्हटलं आहे की, सभागृहात रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, वाकडं काम करून नंतर गौरव मिळवणारे मंत्री या सरकारमध्ये आहेतच, पण आता थेट अधिकार्यांच्या कानाखाली मारण्याची धमकी देणारी मंत्रीही त्यात भर म्हणून आली आहे.
पवार पुढे म्हणतात, 'राज्यमंत्री कोणत्या अधिकारात अशा प्रकारची धमकी देतात? केवळ सरकारी कार्यक्रमात टार्गेट पूर्ण न केल्यामुळे अशा प्रकारे वागणं म्हणजे सत्तेचा उन्माद आहे.' ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून म्हणतात की, 'फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधले आहेत आपण? तुमच्या मंत्रिमंडळाची फक्त इज्जत जात नाही, तर महाराष्ट्राचीही बेअब्रू होतेय.'