मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या सत्तास्थितीत एकनाथ शिंदे यांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
'एकनाथ शिंदे हा फार किरकोळ माणूस आहे. अमित शाह यांच्या मेहरबानीवर गांडूळासारखा जगतोय. त्यामुळे त्याच्या विधानांना आम्ही काहीही महत्त्व देत नाही,' अशी टीका करत संजय राऊतांनी शिंदेंवर थेट घणाघात केला आहे. विधानभवनातील भाषणात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्यावर 'केमिकल लोचा''चा उल्लेख केला होता, यावरून संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत म्हणाले, 'सत्तेच्या खुर्चीसाठी दिल्लीच्या नेत्यांच्या कुरापतींचा आधार घेणाऱ्या शिंदेंना आम्ही गंभीरपणे घेत नाही. जे लोक स्वतःच्या अस्तित्वासाठी इतरांची कुरघोडी करत आहेत, त्यांच्या शब्दांनी आम्हाला फरक पडत नाही.'
हेही वाचा: मीरा रोडमधील सभेतील भाषणामुळे राज ठाकरे गोत्यात?
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, असे आरोप आणि चर्चांना फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. 'कोणाचाही बाप असो, मुंबई वेगळी होणार नाही,' असं फडणवीस म्हणाले. मात्र, यावर राऊतांनी भाजपवरच निशाणा साधला.
'मुंबई तोडण्याचा कारस्थान भाजपचं आहे. व्यापारी आणि दलाल यांच्या संगनमताने मुंबईचं आर्थिक शोषण सुरू आहे आणि भाजप त्याला खतपाणी घालत आहे,' असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. मुंबईचा पैसा लुटण्याचा डाव हेच भाजपच्या मुंबईविषयीच्या भूमिकेचं प्रतिबिंब आहे, असंही ते म्हणाले.दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना दिलेलं थेट आव्हान सध्या चर्चेत आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, 'राज ठाकरेंचं हे आव्हान फक्त दुबेला नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान देणाऱ्या भाजपला आहे.'
हेही वाचा: 'मुंबईत ये दुबे… समंदरात डुबे-डुबे कर मारू'; भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानावर राज ठाकरेंचा स्फोटक प्रत्युत्तर
दुबे यांचे मराठी माणसाविरोधातले विधान संतापजनक असल्याचं सांगत राऊत म्हणाले, 'भाजप नेत्यांनी त्यांच्यावर ठोस भूमिका घेतली नाही. हा अपमान फक्त महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण मराठी जनतेचा आहे.'
राजकारणात वाढत्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ठाकरे गट, भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचं दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.