Ganesh Festival Rules: भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भाविकांच्या मनाशी घट्ट जोडलेला सण. बुद्धीचा देव, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती अशा स्वरूपात श्री गणेशाची पूजा केली जाते. 2025 मध्ये गणेश चतुर्थी बुधवार, 27 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत घरोघरी, मंडपात आणि मंदिरात भक्तिभावाने उत्सव साजरा केला जाईल.
गणेश पूजनाची प्राचीन परंपरा
इतिहास सांगतो की गणेश पूजनाची परंपरा तब्बल साडेतीन हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. भाद्रपद महिन्यात धान्य तयार होत असल्याने पृथ्वीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या काळात मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा प्रघात आहे. पूर्वी नदीकाठच्या किंवा शेतातील मातीपासून मूर्ती तयार करून पूजन व लगेच विसर्जन केले जात असे. नंतर मूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन करण्याची प्रथा रूढ झाली.
हेही वाचा: Ganesh Chaturthi Wishes 2025: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थी निमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा
गणेशोत्सवातील आवश्यक नियम
शास्त्रानुसार गणपती पूजन करताना काही बाबींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे मानले गेले आहे –
गणेशाची मूर्ती 8 ते 10 दिवस आधी घरी आणता येते. ती फक्त आदल्या दिवशीच आणावी अशी सक्ती नाही.
गर्भवती स्त्री घरात असल्यास मूर्ती विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. अशा वेळीही विसर्जन करता येते.
प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती उत्तरपूजा करून विसर्जित करावी. वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे, अशी सक्ती नाही; तलाव, टँक किंवा घरी ठेवलेल्या पाण्याच्या पात्रातसुद्धा विसर्जन शक्य आहे. मात्र मूर्ती मातीची किंवा शाडूची असावी, जेणेकरून ती सहज विरघळेल.
हेही वाचा: Ganesh Chaturthi 2025: तुम्ही पहिल्यांदा घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर 'या' चुका टाळा
गौरी पूजनाचे महत्त्व
गौरी म्हणजेच पार्वती, गणपतीची माता. काही प्रथेप्रमाणे तिला महालक्ष्मी असेही मानले जाते. गौरी मूर्ती तेरड्या, खडे, मुखवटे किंवा मातीच्या स्वरूपात आणल्या जातात.
भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते तर ज्येष्ठा नक्षत्री पूजन केले जाते.
काही घरांमध्ये नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी तो खाण्याची प्रथा आहे; मात्र शास्त्र सांगते की देवतेने नैवेद्य तत्काळ स्वीकारलेला असतो. त्यामुळे तो लगेच प्रसाद म्हणून ग्रहण करणे उचित आहे.
घरातील कुळाचार, परंपरा आणि श्रद्धेनुसार गौरी व गणपती पूजन केले जावे. कुठलीही रुढी किंवा गैरसमज पाळण्यापेक्षा शास्त्र आणि भावनेवर आधारित पूजन महत्त्वाचे आहे.
हेही वाचा: Ganesh Chaturthi 2025: ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ म्हणताना तुम्हीही चुका करता का? जाणून घ्या गणेश आरतीतील 'या' सर्वात कॉमन चुका
आजच्या काळातील अर्थ
पर्यावरणपूरक मूर्ती, पाण्याची नासाडी टाळणारे विसर्जन आणि साधेपणात भव्यतेचा उत्सव हे आजचे नवे रूप आहे. श्रद्धा टिकवून ठेवत विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वीकारल्यास बाप्पाची पूजा अधिक अर्थपूर्ण ठरते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥