Extramarital Affair Exposed After Failed Online Payment : योगायोग ही गोष्ट आपल्या जीवनात कधी कधी खूप महत्त्वाची भूमिका बजावते, याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. असाच एका माणसाच्या बाबतीत घडला, ज्याने स्वतःच्या पत्नीची फसवणूक करून स्वतःच्या सुखी संसाराला गालबोट लावले होते. या माणसाचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. पत्नीच्या नजरेआड त्याचे उद्योग बिनबोभाट चालू होते. पण एक दिवस असा काही योगायोग घडला, की त्याचा भांडाफोड झाला आणि पत्नीला सर्व काही कळल्यामुळे घटस्फोटाची वेळ येऊन ठेपली.
चीनमधील ग्वांगडोंगमधील यांगजियांग येथील एका पुरूषाने गर्भनिरोधक गोळ्यांसाठी केलेले ऑनलाईन मोबाईल पेमेंट अयशस्वी झाल्याने फार्मसी कर्मचाऱ्यांनी त्याच्या पत्नीला फोन केला, या मनुष्याचे सर्व उद्योग त्याच्या पत्नीला कळले. यानंतर पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला. कहर म्हणजे, या मनुष्याला आपण पत्नीची फसवणूक केली ही स्वतःची चूक मान्यच नव्हती. त्याने थेट फार्मा कंपनीला त्याचे वैवाहिक जीवन धोक्यात येण्यासाठी जबाबदार धरले. यामुळे कायदेशीर वाद निर्माण झाला.
या चिनी पुरूषाने गुपचुपपणे पत्नीला कल्पना नसताना गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे मोबाईल पेमेंट अयशस्वी झाल्याने त्याचे डाव त्याच्यावरच उलटला आणि अनवधानाने त्याच्या पत्नीला त्याचे विवाहबाह्य संबंध माहीत झाले.
हेही वाचा - Graduation Legacy Act: ऐकावं ते नवलंच ! पदवी मिळवण्यासाठी 'या' देशात लावावी लागतात झाडं
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, त्या पुरूषाने ग्वांगडोंग प्रांतातील यांगजियांग येथील एका फार्मसीमध्ये जाऊन गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या. त्याच्या बिलापोटी 15.8 युआन (अंदाजे 200 रुपये) त्याच्या मोबाईल पेमेंट कोडचा वापर करून पेमेंट केले. मात्र, त्याचा भांडाफोड व्हायची वेळ आली होती की काय, म्हणून हे पेमेंट अयशस्वी झाले. "सिस्टम एरर" मुळे व्यवहार होऊ शकला नाही.
नंतर पेमेंट वसूल करण्यासाठी फार्मसी कर्मचाऱ्यांनी त्याच्या सदस्यता कार्डशी जोडलेल्या फोन नंबरवर कॉल केला. हा कॉल त्याच्या पत्नीला लागला. तिला नवरोबांच्या या खरेदीबद्दल माहिती नव्हते. तिने विचारणा केली असता, फार्मसी कर्मचाऱ्यांनी ही गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी असून त्यासाठीचे पेमेंट असल्याची पुष्टी केली. यामुळे त्या पुरूषाचे अनैतिक प्रेमसंबंध लगेच त्याच्या पत्नीला समजले.
'चोराच्या उलट्या...'
या सर्व प्रकारानंतर त्या पुरूषाने या घटनेने दोन कुटुंबे उद्ध्वस्त केली असल्याचे सांगत त्यासाठी फार्मसीला जबाबदार धरले. त्याने यांगजियांग पब्लिक सिक्युरिटी ब्युरोच्या गाओक्सिन शाखेअंतर्गत येणाऱ्या पिंगगांग पोलिस स्टेशनमधून 12 ऑगस्ट रोजी आलेल्या पोलिस अहवालासह गोळ्यांची पावती दिली.
हेनान झेजिन लॉ फर्मचे संचालक फू जियान यांनी एलिफंट न्यूजला सांगितले की, तो पुरूष कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु ते त्याच्यासाठी कठीण होईल.
"खरे तर, या पुरुषाने त्याच्या पत्नीचा विश्वासघात केला आहे. हेच त्याच्या कुटुंबाच्या विघटनाचे मुख्य कारण आहे आणि त्याने त्याच्या कृतींची जबाबदारी स्वतःच स्वीकारली पाहिजे. त्यासाठी दुसऱ्या कोणाला जबाबदार धरता येणार नाही. दुसरीकडे, जर फार्मसीने त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले असेल, तर त्याने कायदेशीररीत्या पटवून सांगितले पाहिजे की, फार्मसी कंपनी या सर्व घटनेला कशी जबाबदार असू शकते." असे फू म्हणाले.
फू पुढे म्हणाले की, 'त्या पुरूषाने फार्मसीची कृती आणि त्याच्या लग्नाच्या विघटनामधील थेट संबंध सिद्ध करणारे भक्कम पुरावे सादर केले पाहिजेत. त्यांनी पुढे म्हटले की, आमच्या फार्मसीकडून केला गेलेला फोन कॉल बिलाचे पेमेंट वसूल करण्यासाठी होता. त्या पुरुषाची वैयक्तिक माहिती उघड करण्यासाठी नव्हता. त्याचे वैयक्तिक जीवन बिघडवण्याचा फार्मसीचा उद्देश नव्हता. त्यामुळे त्याच्या गोपनीयतेच्या हक्कांचे उल्लंघन सिद्ध होण्याची शक्यता खूपच कमी आहे.'
हेही वाचा - ..फक्त सलमा हायेकच नाही, Donald Trumpनी Emma Thompsonलाही 'डेट'साठी विचारलं होतं, 'मला आवडेल की तू...'
आणखी एक असाच प्रकार
यापूर्वी, एका चिनी महिलेने तिच्या पतीच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये, जिथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता, एक छुपा कॅमेरा बसवला आणि त्यांचे प्रेमसंबंध उघड करणारे व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करून समाज माध्यमांवर खळबळ उडवून दिली. या प्रकरणी न्यायालयाने तिने (पत्नीने) ते फुटेज हटवावे, असा निर्णय दिला. परंतु, तिच्या पतीसोबत प्रेमसंबंधांत राहणाऱ्या महिलेने या प्रकाराबद्दल मागितलेली भरपाई देण्याची किंवा माफी मागण्याची विनंती न्यायालयाने नाकारली.