PM Keir Starmer, President Zelenskyy Meeting : प्रसार माध्यमांसमोरच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्यात रशिया-युक्रेन युद्धावरून मतभेद झाले. आता युद्ध सुरू ठेवण्यासाठी युक्रेनला आणखी मदत करता येणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. अचानकपणे अमेरिकेची मदत बंद झाल्यामुळे युक्रेन संकटात सापडला. युद्धबंदी होऊन तह करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवलीच होती. तेवढ्यात ब्रिटनने पुढे येत झेलेंस्की आणि युक्रेनला दिलासा दिला. मात्र, यामुळे युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेतच अशांतता समोर आली.
रशियाबरोबरच्या युद्धासाठी अमेरिका करत असलेल्या मदतीमुळे अमेरिकेचा खर्च खूप वाढला आहे. आता युद्ध सुरू ठेवण्यासाठी युक्रेनला आणखी मदत करता येणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. यानंतर युक्रेन युद्धासाठी अमेरिका देत असलेला पैसा हा वायफळ खर्च असल्याचे सांगत त्यांनी सरळ या निधीला कात्री लावली. अशा स्थितीत आता ब्रिटनने युक्रेनला मोठी आर्थिक मदत कर्ज रुपाने दिली. इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी झेलेंस्की यांची गळाभेट घेतली आणि त्यांची पाठ थोपटली. आता ब्रिटन युक्रेनच्या पाठीशी असल्याचा संदेश जगाला दिला. या सर्व घडामोडींमुळे जगाचा नकाशा लवकरच बदलण्याची अटकळ बांधण्यात येत आहे.
हेही वाचा - 'ते आमच्यावर चिखलफेक करतात...' इटलीच्या पंतप्रधानांचा डाव्या पक्षांवर ढोंगीपणाचा आरोप; म्हणाल्या,'मी, मोदी आणि ट्रम्प..'
248 अब्जांची मदत
युक्रेन आणि आणि इंग्लंडमध्ये शनिवारी 2.26 अब्ज पाऊंड, 2,48,63,86,46,000 रुपये कर्ज देण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली. ही आर्थिक मदत युक्रेन सुरक्षेसाठी वापरणार आहे. युक्रेन आणि रशियात गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. त्यात झेलेंस्की हे एकटे पडल्याचे अनेकदा दिसून आले. पण फ्रान्स, युरोप आणि आता इंग्लंड या दोस्त राष्ट्रांनी त्यांची बाजू भक्कम केली आहे. यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला. त्याला झेलेंस्की यांनी सुद्धा तितकेच कडक उत्तर दिले.
युनायटेड किंगडम युक्रेनच्या पाठीशी
इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टार्मर आणि राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांची भेट झाली. त्यावेळी स्टार्मर यांनी युक्रेनच्या पाठीशी युनायटेड किंगडम खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. ब्रिटेनची ही भूमिका अगदी सहज घेण्यासारखी नाही. सध्या अमेरिका आणि त्यांच्या युरोपियन मित्र राष्ट्रांमधील संबंध ताणलेल्या स्थितीत आहेत. ट्रम्प यांनी जोरदार 'टॅरिफ वॉर' सुरू केले आहे. त्यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर जबरदस्त आयात शुल्क लावायला सुरुवात केली आहे. यातून युरोपातील मित्र देशही सुटलेले नाहीत. मात्र, आता युरोपातील राष्ट्रांनी अमेरिकेच्या दादागिरीला भीक घालत नसल्याचा मोठा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्याचे मानले जात आहे. आता रशिया-युक्रेनमधील स्थिती हाताळण्याची जबाबदारी युरोपीय राष्ट्रांनी स्वतःच्या शिरावर घेतल्याचे दिसत आहे. हा थेट रशियाला इशारा नाही तर, अमेरिकेला आणि ट्रम्प यांच्या धोरणाला उघड उघड विरोध असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 10 डाउनिंग स्ट्रीट वरून जगाचा नकाशा बदलण्याच्या हालचाली दिसून आल्या. यावरून युरोपियन राष्ट्रे आता अमेरिकेला डोळे वटारून दाखवत असल्याचे दिसून येत आहे. ग्रेट ब्रिटनने युक्रेनला संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 2,48,63,86,46,000 रुपये कर्ज देण्याचा करार केला आहे.
हेही वाचा - Pope Francis : 88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक; मात्र, जीवाला धोका नाही