नवी दिल्ली: रशियाच्या तेल व टॅरिफवरून भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूप चांगले मित्र म्हटले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले की, "भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला खात्री आहे की आमच्या व्यापार चर्चेमुळे भारत-अमेरिका भागीदारीच्या अमर्याद शक्यतांची दारे उघडतील. आमच्या टीम्स शक्य तितक्या लवकर यावर चर्चा करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही दोन्ही देशांच्या लोकांसाठी एक सोनेरी आणि अधिक समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी काम करू."
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केले होते की भारत आणि अमेरिका व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू ठेवत आहोत. येत्या आठवड्यात माझे खूप चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्यास मी उत्सुक आहे. मला खात्री आहे की या चर्चेचा आपल्या दोन्ही महान देशांसाठी फायदा होणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले.
हेही वाचा: Nepal Gen- Z Protest: रॅपर, महापौर ते Gen-Z आंदोलकांचे चाहते, कोण आहेत बालेन शाह?
शनिवारी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेतील मजबूत संबंधांवर भर दिला होता. तसेच अमेरिका-भारत संबंधांना 'खास' म्हटले होते. ट्रम्प म्हणाले होते की, मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण सध्या ते जे करत आहेत ते मला आवडत नाही. परंतु भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप खास आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. कधीकधी आपल्यात काही मतभेद असतात.