Bounty for mosquitoes in phillipine : आपल्या सर्वांना 'माशा मारणे' हा वाक्प्रचार माहीत आहे. याचा अर्थ काही काम न करणे किंवा काम नसणे. मात्र, आता एका देशाने 'डास मारणे' अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. विशे, म्हणजे या देशातील एका गावाने लोकांना डासांचे निर्मूलन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी डास मारून आणण्याची किंवा जिवंत पकडून आणण्याची मोहीम राबवली आहे. मृत किंवा जिवंत डास पकडून आणल्यानंतर लोकांना पैसे बक्षीस दिले जात आहेत. अर्थातच, या कामाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जिवंत आणि मेलेले डास घेऊन लोकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आता या देशात कोणीही 'काय चाललंय' म्हणून विचारलं तर, 'डास पकडतोय' असं बिनधास्त सांगण्यासारखी परिस्थिती झाली आहे.
डासांमुळे साथीच्या रोगांचा फैलाव वेगात होतो. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. डासांच्या निर्मूलनासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील एका गावात एक अनोखी मोहीम राबवली जात आहे. हे गाव आपल्या नागरिकांना मृत किंवा जिवंत डास पकडण्यासाठी पैसे आणि बक्षीस देत आहे, त्यामुळे या आशियाई देशाची जगभरात चर्चा होत आहे. डेंग्यूच्या उद्रेकामुळे ही मोहीम राबविण्यात येत आहे. नेमका हा प्रकार काय आहे? चला, जाणून घेऊ.
Dengue Spread Prevention : डासांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनोखी मोहीम
हा अनोखा उपक्रम मध्य मनीलाच्या मांडलुयोंग शहरातील बरंगे ॲडिशन हिल्स या शहरी गावाने सुरू केला आहे. या गावातील एक लाखांहून अधिक रहिवासी गर्दीच्या परिसरात आणि निवासी कॉन्डोमिनियम टॉवरमध्ये राहतात. गावचे प्रमुख कार्लिटो सेर्नल यांनी प्रत्येक पाच डास किंवा डासांच्या अळ्यांसाठी एक फिलिपिन्स पेसो (दोन अमेरिकी सेंटपेक्षा कमी) बक्षीस जाहीर केले. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, मोहीम सुरू होताच 21 जणांनी एकूण 700 डास गावाच्या कार्यालयात आणले. मिग्युएल लबाग या 64 वर्षीय सफाई कामगाराने 45 डासांच्या अळ्यांचा एक जग दिला आणि त्यांना नऊ पेसो (15 सेंट)चे बक्षीस मिळाले. 'चांगले पैसे मिळाले, आता मी यातून एक कप कॉपी घेऊ शकतो,' असे ते म्हणाले. ही मोहीम किमान महिनाभर चालणार आहे.
हेही वाचा - 'हे भयंकर पाप! या धक्क्यातून मी कधीही सावरू शकणार नाही', बाळ झाल्यावर महिलेनं फर्टिलिटी क्लिनिकला कोर्टात खेचलं
डेंग्यूचे वाढते रुग्ण
फिलिपिन्समध्ये डेंग्यू संसर्गाची झपाट्याने वाढ होत असल्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ॲडिशन हिल्सच्या जवळच्या शहराने शनिवारी स्पष्ट केले की, या वर्षी लागण झालेल्या 1,769 रहिवाशांपैकी 10 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. आणखी आठ क्षेत्रांमध्ये संभाव्य प्राणघातक विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. फिलिपिन्समध्ये या वर्षी 1 फेब्रुवारीपर्यंत 28,234 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. 'ही संकटाची घंटा आहे, त्यामुळे आम्ही हा मार्ग शोधला आहे,' असे गावातील नेते सर्नल म्हणाले.
याबरोबरच ॲडिशन हिल्सने डेंग्यूचा सामना करण्यासाठी स्वच्छता, कालवे साफ करणे आणि स्वच्छता मोहिमांचीदेखील सुरुवात केली आहे. दरम्यान, यावर टीका करणाऱ्यांनी असा इशारा दिला की, आता लोकांनी बक्षीसासाठी डासांची पैदास करण्यास सुरुवात केली तर मात्र, हे प्रकरण स्वतःवरच उलटेल. सर्नल यांच्या म्हणण्यानुसार, हे शक्य नाही, कारण रुग्णांची संख्या वाढणे कमी होताच मोहीम थांबवली जाणार आहे. क्वेझॉन शहरातील दुसऱ्या एका गावातील अधिकारी डासांना खाण्यासाठी बेडकांना सोडण्याचा विचार करत होते.
फिलिपिन्सच्या आरोग्य विभागाने (DOH)सांगितले, 'डेंग्यूशी लढण्यासाठी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या चांगल्या हेतूचे कौतुक आहे.' अधिकाऱ्यांनी लोकांना लांब बाह्यांचे शर्ट आणि फुल पँट घालण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, कीटकनाशक वापरावे, त्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि पाणी साचू न देण्याचा सल्लाही दिला आहे. आरोग्य सचिव टीओडोरो हर्बोसा यांच्या म्हणण्यानुसार, डासांच्या उत्पत्तीची जागा स्वच्छ करणे आवश्यक आहे आणि ज्यांना संसर्गाची लक्षणे दिसून आली, त्यांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. डेंग्यूच्या संसर्गात वाढ होऊनही फिलिपिन्सने मृत्यूदर कमी राखण्यात यश मिळवले आहे असे ते म्हणाले. जूनमध्ये सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या आधी डेंग्यूची प्रकरणे अनपेक्षितपणे वाढली, कदाचित अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे डेंग्यूला कारणीभूत असलेल्या डासांची पैदास होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. हवामानातील बदल कदाचित अवकाळी मुसळधार पावसास कारणीभूत ठरत आहे. पावसामुळे इन्फ्लूएंझा आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हा आजार उंदरांमुळे आणि जेव्हा लोक पुराच्या पाण्यात जातात तेव्हा होतो, असा अहवाल डेंग्यू व्यतिरिक्त फिलिपिन्सच्या आरोग्य विभागाने दिला.
डेंग्यू कसा पसरतो?
- डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे, जो उष्णकटिबंधीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या विषाणूचा प्रादुर्भाव शहरी भागात वारंवार होतो जिथे स्वच्छता पुरेशी नसते, ज्यामुळे डासांना विषाणू पसरवणे सोपे होते.
- यामुळे सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि पुरळ येऊ शकतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास, रक्तस्त्राव आणि अवयव निकामी होऊ शकतात.
- या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नसला तरी, व्यक्तीच्या द्रवपदार्थाची पातळी राखण्यासाठी वैद्यकीय सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
- 2024 मध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या आजारामुळे दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा - म्याँव म्याँव.. मांजरीनं चपळाईनं केलं विमान हायजॅक; उड्डाण झालं 2 दिवस लेट, हुश्श.. अखेर अशी आली बाहेर..