KP Sharma Oli: नेपाळमध्ये उसळलेल्या हिंसक आंदोलनांमुळे मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि संघर्ष घडले. नेते आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांना आग लावण्यात आल्याने गोंधळ वाढला. या गोंधळात माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली नेमके कुठे आहेत याबद्दल अनेक दिवसांपासून अटकळ लावली जात होती. काही वृत्तांमध्ये ते देश सोडून पळाले असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता खरे चित्र समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलन हिंसाचारात बदलल्यानंतर ओली यांना नेपाळ सैन्याच्या संरक्षणाखाली शिवपुरी वनक्षेत्रातील लष्करी बॅरेकमध्ये हलविण्यात आले होते. तिथे त्यांनी सलग नऊ दिवस घालवले. त्याच काळात, 9 सप्टेंबर रोजी त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. नेपाळमधील ‘जनरल-झेड’ पिढीच्या नेतृत्वाखालील या हिंसक निदर्शनांमध्ये त्यांचे बालुवातारमधील अधिकृत निवासस्थान पूर्णपणे जाळून टाकण्यात आले.
हेही वाचा - Operation Sindur: लष्कर-ए-तैयबा कार्यकर्त्याने दिली मुरीदके कॅम्प उद्ध्वस्त झाल्याची कबुली; पुनर्बांधणी दावा करत शेअर केला व्हिडिओ
नऊ दिवसांनंतर ओली बॅरेकमधून बाहेर पडले असून ते आता काठमांडूच्या पूर्वेस सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या भक्तपूर जिल्ह्यातील गुंडू येथील एका खाजगी घरात राहत आहेत, असे स्थानिक वृत्तांनी नमूद केले आहे. 9 सप्टेंबर रोजी आंदोलकांनी बालुवातारमधील पंतप्रधान कार्यालयालाही आग लावली होती. त्यावेळी ओली अधिकृत निवासस्थानीच होते. त्यांच्या सुरक्षेसाठी सैन्याने तातडीने हेलिकॉप्टर पाठवून त्यांना बाहेर काढले आणि लष्करी संरक्षणात ठेवले.
हेही वाचा - Doland Trump Statue : अमेरिकन संसदेबाहेर डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 फुटी पुतळा; हातात बिटकॉइन
दरम्यान, देशभरातील हिंसाचारानंतर नेपाळमध्ये हंगामी सरकार स्थापन झाले आहे. माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांनी या हिंसाचार, जाळपोळ आणि लूटमारीच्या घटनांची न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या अलीकडील इतिहासातील सर्वात भीषण घटनांपैकी या अशांततेत किमान 72 जणांचा मृत्यू झाला होता.