तुळजापूर: नुकताच, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीपोटी तुळजापुरमधून जवळपास 100 लोक गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच, तुळजापूरमध्ये जवळपास 15 ते 20 पेडलरच्या माध्यमातून ड्रग्जची अवैध तस्करी होत आहे अशी माहिती समोर येत आहे. तुळजापूरमधील काही खास हॉटेलमधून या ड्रग्जची अवैध विक्री होत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र, या प्रकरणाचे धागेदोरे खूप खोलवर गेले असल्याचे दिसत असून पोलिस या घटनेवर तपास करत आहेत.
21 आरोपी अजूनही फरार:
आतापर्यंत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या प्रकरणातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. यामुळे पोलिसांना फरार झालेल्या आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक असणार आहे. सध्या, या ड्रग्ज प्रकरणामध्ये 35 आरोपींपैकी 14 आरोपींना अटक केली असून, अजूनही 21 आरोपी फरार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
प्रादेशिक युनिटच्या मदतीने ड्रग्ज बनविण्याच्या कारखान्यावर धाड:
मुंबईमधील महसूल गुप्तचर संचालनालयांनी (DRI) पुणे येथील त्यांच्या प्रादेशिक युनिटच्या मदतीने लातूर जिल्ह्यातील ड्रग्ज बनविण्याच्या कारखान्यावर धाड टाकून मुद्देमाल जप्त केला आणि त्यांच्यावर कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी काम करणाऱ्या तीन जणांना, मिरा रोड आणि मुंबई परिसरात ड्रग्जचा अवैध पुरवठा करून विक्री करणाऱ्या मुद्दू नावाच्या व्यक्तीला हटकेश येथे मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे यांच्या शेतामध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना:
तर दुसरीकडे, मिरा रोड, भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयांच्या अंतर्गत येणाऱ्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेमध्ये काम करणारे पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे यांच्या शेतामध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे हे मागील काही 15 दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होते. यामध्ये त्यांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये अजून एक पोलीस हवालदार पवार यांचे नाव समोर येत आहे. तसेच, यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.