हितेश मिश्राम. प्रतिनिधी. नागपूर: देशातील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची तब्बल साडे नऊ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नागपुरात घडला असून मुंबईतील चार ठगांनी मिळून हल्दीराम समूहाची फसवणूक केली आहे. या प्रकरणात पती, पत्नी, मुलगा आणि एक भागीदार अशा चौघांचा समावेश आहे.
फसवणुकीचा मास्टर प्लॅन
हा प्रकार नागपुरात घडला असून मुंबईतील 4 ठगांनी मिळून हल्दीराम समूहाची फसवणूक केली आहे. समीर अब्दुल हुसेन लालानी, हिना समीर लालानी, त्यांचा मुलगा आलिशान समीर लालानी आणि भागीदार प्रकाश भोसले अशी आरोपींची नावे आहेत. 4 ठगांनी मिळून 'रॉयल फूड इंडस्ट्री' ही सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी कंपनी असल्याचे सांगितले. त्यासोबतच, कंपनीची वार्षिक उलाढाल 15 कोटी रुपये असल्याचा बनाव केला. इतकंच नाही, तर मोठ्या प्रमाणात कच्चा माल असल्याचे दर्शविणारी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यासोबतच, हल्दीराम ग्रुपच्या खाजगी गुंतवणूक व्यवहारांची देखरेख करणारे सचिन डावले यांनी यांनी कागदपत्रांची तपासणी केली आणि रॉयल फूडने सादर केलेल्या तीन वर्षांची बॅलेन्स शीट, नफा-तोट्याचे बनावट दस्तऐवजांची तपासणी केली. गुंतवणुकीच्या बदल्यात समभागात 35% वाटा देण्याचे आमिष दाखवून ठगबाजांनी हल्दीराम समूहाची फसवणूक केली. या फसवणुकीमुळे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. हल्दीराम समूहासारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित कंपनीची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, ही वस्तुस्थिती इतर व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण करत आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीने अत्यंत शिताफीने बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास संपादन केला आणि मोठ्या रकमेची लूट केली.