Sunday, September 14, 2025 03:10:16 AM

अनैतिक संबंधातून विधवा महिलेची निर्घृण हत्या

नैतिक संबंधातून गावातीलच तरुणाने विधवा महिलेची दोरीने गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना, दुपारच्या सुमारास लाखनी तालुक्यामधील ग्राम मोगरा/शिवणी येथे घडली.

अनैतिक संबंधातून विधवा महिलेची निर्घृण हत्या

भंडारा: शुक्रवारी, 21 मार्च 2025 रोजी, दुपारी अनैतिक संबंधातून गावातीलच तरुणाने विधवा महिलेची दोरीने गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना, दुपारच्या सुमारास लाखनी तालुक्यामधील ग्राम मोगरा/शिवणी येथे घडली असून पुष्पा रामेश्र्वर बनकर असे मृत महिलेचे नाव आहे. तर खुशाल पुरुषोत्तम पडोळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. 


शेतात बोलवून केली हत्या:

विधवा महिला पुष्पा रामेश्र्वर बनकर भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या 2 मुलांचा सांभाळ करत होती. काही वर्षांपूर्वी, पुष्पा रामेश्र्वर बनकर यांच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, शुक्रवारी, आरोपी खुशाल पुरुषोत्तम पडोळेने विधवा महिलेला शेतामध्ये बोलवून, दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. 


आरोपीने केला स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन:

विधवा महिला पुष्पा रामेश्र्वर बनकर यांना शेतामध्ये बोलवून तिला जीवे मारल्यानंतर आरोपी खुशाल पुरुषोत्तम पडोळेने लाखनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर, क्षणाचाही विलंब न करता पोलिस घटनस्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठवले. घटनेचे गांभीर्य पाहून अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हाण, पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव आणि लाखनी पोलिस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते.


अडीच वर्षांपासुन दोघांचे अनैतिक संबंध:

मृतक महिला पुष्पा रामेश्र्वर बनकर आणि आरोपी खुशाल पुरुषोत्तम पडोळेचे गेल्या अडीच वर्षांपासुन अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मोगरा जवळील नाल्याजवळ मृतक महिलेचे शेत आहे. शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. घटनेच्या दिवशी, मृतक महिला शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेली होती. थोड्याच वेळात, आरोपी खुशाल पुरुषोत्तम पडोळे तिथे आला. यादरम्यान, काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढल्यामुळे आरोपीने मृतक महिलेच्या शेताजवळ असलेल्या सागवानाच्या वाडीत असलेल्या दोरीने गळा आवळून विधवा महिलेची निर्घृणपणे हत्या केली.


सम्बन्धित सामग्री