Lodha Developers Fraud: रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी कंपनी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडला तब्बल 85 कोटी रुपयांचा फटका बसवणाऱ्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या तक्रारीनुसार, सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2025 दरम्यान लोढा यांनी आपल्या मुलगा साहिल लोढा आणि उषा प्रॉपर्टीजशी संबंधित सहकाऱ्यांसह संगनमत करून कंपनीच्या जमिनी आणि ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स (टीडीआर) अवैधरीत्या विकले. आरोपानुसार, हे व्यवहार त्यांच्या अधिकाराबाहेर जाऊन कच्च्या किमतीत करण्यात आले.
राजेंद्र लोढा यांच्यावरील मुख्य आरोप
लोढा यांनी व्यवहार सुलभ करण्यासाठी बनावट करार, सामंजस्य करार आणि इतर कागदपत्रे तयार केली. तक्रारीत असे दिसून आले आहे की पनवेल, अंबरनाथ आणि कल्याणमधील जमीन बनावट व्यवहारांद्वारे हडप करण्यात आली होती, तर कंपनीच्या मार्की प्रकल्प लोढा न्यू कफ परेडमध्ये बनावट बुकिंग आणि रोख व्यवहार दाखवण्यात आले होते. कल्याणमधील भोपर गावात 7.15 लाख चौरस फूटांपेक्षा जास्त टीडीआर बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचा आरोप आहे, ज्यामुळे सुमारे 49 कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले.
हेही वाचा - Avinash Jadhav On Meenatai Thackeray Statue: '24 तासात कारवाई झाली नाही तर...'; अविनाश जाधवांचा इशारा
दरम्यान, कंपनीने असाही आरोप केला आहे की बेकायदेशीरपणे मिळवलेला नफा बनावट कंपन्या आणि बेनामी मालमत्तेत वळवण्यात आला. लोढा यांनी व्यवस्थापनाला धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हेही वाचा - Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन
या प्रकरणात लोढा पिता-पुत्राबरोबरच उषा प्रॉपर्टीजचे भरत नरसाना, नितीन वाडोर आणि रितेश नरसाना यांचीही नावे समोर आली आहेत. कंपनीने पोलिसांना ईमेल्स, जमिनीचे करार, पॉवर ऑफ अॅटर्नी आणि संबंधित कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली आहेत. तपासानंतर न्यायालयाने राजेंद्र लोढा यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.