सध्या, उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये झालेल्या मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या हत्याकांडाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या हत्याप्रकरणात, मृत सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे मूळ आरोपी आहेत. घटनेबद्दलची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलं असून सध्या ते तुरुंगात आहेत. तपासादरम्यान, अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. सौरभला बेशुद्ध करण्यासाठी मुस्कानने इंजेक्शन खरेदी केले होते, अशी माहिती सध्या समोर येत आहे. मात्र अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, हा गुन्हा घडला तरी कसा? आपल्या लेकीने आपल्याच जावयाची हत्या केली तरी कशी? नेमकं कोणत्या कारणांमुळे तिने इतकी टोकाची भूमिका घेतली असावी? जाणून घेऊया सविस्तर.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार:
मेरठ हत्याकांड प्रकरणात, सौरभ राजपूतचा अत्यंत क्रूरपणे मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार,'सौरभच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव आढळून आले आहेत. त्यासोबतच, सौरभच्या छातीवर चाकूच्या तीन खोल जखमा तसेच मनगटावर आणि मानेवर चाकूच्या खोल खुणा आहेत. सौरभची मान धडापासून पूर्णपणे वेगळी झाली होती आणि त्याचे दोन्ही हात मनगटापासून कापले गेले होते. हृदयाजवळ खोल जखमा देखील होत्या आणि छातीच्या डाव्या बाजूला 6 सेमी x 3 सेमी आकाराच्या खोल जखमा आढळल्या आहेत', अशी माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असल्याचे समोर आले आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, 'सौरभच्या हत्येचे कारण जास्त रक्तस्त्राव आणि चाकूच्या जखमेमुळे झालेला शॉक होता. त्याच्या शरीरावर एकूण पाच गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. त्यासोबतच, त्याचे संपूर्ण शरीर पूर्णपणे कुजलेले होते आणि त्याचा चेहरादेखील गंभीरपणे सुजलेला होता. त्यातील एक डोळे बंद आणि दुसरे उघडे होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात मृतदेहाला सिमेंटमध्ये गुंडाळून त्याला ड्रममध्ये ठेवले होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सौरभच्या हनुवटीवर जखमा होत्या आणि त्याच्या मानेवर फासाच्या खुणाही आढळल्या होत्या. ज्यामुळे, ही हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आल्याचे दिसून येते'.
आधी बेपत्ता आणि मग सौरभच्या खुनाचा खुलासा:
18 मार्च 2025 रोजी, सौरभच्या भावाने म्हणजेच बबलूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'माझा भाऊ 5 मार्च 2025 पासून बेपत्ता आहे. आपली मेहुणी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी मिळूनच आपल्या भावाची हत्या केली असावी, असा माझा संशय आहे'.
हेही वाचा: अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीने केला मर्चंट नेव्ही ऑफिसर पतीचा गेम
आरोपी मुस्कानच्या कुटुंबीयांनी केला तिच्यापासून दुरावा:
आपल्याच पोटच्या मुलीने केलेल्या नवऱ्याच्या हत्येप्रकरणी, आरोपी मुस्कानच्या कुटुंबीयांनी तिला नाकारलं. त्यासोबतच, तिला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत करणार नाही, अशी भावना आरोपी मुस्कानच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 'आम्ही मुस्कानशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे', असे देखील यावेळी तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
आरोपी मुस्कानची आई म्हणाली:
या घटनेनंतर, आरोपी मुस्कानची आई म्हणाली, 'आम्ही तिला (मुस्कानला) कधीही भेटणार नाही किंवा तिच्यासाठी लढणार देखील नाही. हे काही सामान्य प्रकरण नसून खूप मोठा गुन्हा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या शरीराचा भाग कापला जातो, अगदी त्याचप्रमाणे आम्ही तिच्याशी संबंध तोडले आहेत. ती आमची मुलगी आहे, त्यामुळे भावनिकता नक्कीच निर्माण होईल. मात्र, तिने केलेल्या भयानक गुन्ह्यानंतर आम्ही तिला आधार देऊ शकत नाहीत'.
आरोपी मुस्कानचे वडील म्हणाले:
'माझ्या मुलीने जे कृत्य केले आहे ते क्षमा करण्यासारखे मुळीच नाही. तिने जगण्याचा हक्क गमावला आहे. सौरभ हा फक्त आमचा जावई नव्हता, तर आमचा मुलगा होता. त्याने आमच्या मुलीची खूप काळजी घेतली होती. मात्र तिने केलेल्या कृत्यामुळे, तिला फाशी झालीच पाहिजे. ज्यामुळे, भविष्यात इतक्या टोकाची भूमिका घेताना कोणीही शंभरवेळा विचार करेल', असे आरोपी मुस्कानचे वडील म्हणाले.