पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दर दुसऱ्या दिवशी एका पाठोपाठ एक भयंकर घटना ऐकायला मिळत आहे. मात्र, पुणे शहरातील हडपसर परिसरात एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हांडेवाडी परिसरातील सुंदर नावाच्या सोसायटीमध्ये एका नराधमाने पाळीव श्वानावर अनैसर्गिकपणे अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे ही घटना उघडकीस आली:
फिर्याद नोंदवलेला घरमालक कामानिमित्त गावी गेला होता. तेव्हा आरोपीने त्यांच्या गैरहजेरीत 26 मार्च 2025 रोजी रात्रीच्या साधारण 11:30 च्या सुमारास त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये अवैधरित्या प्रवेश करून त्यांची पाळीव कुत्री 'पेनी' (वय: 5 वर्षे) हिच्यासोबत अनैसर्गिकपणे अत्याचार केले. ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होताच, त्याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आणि पुढील चौकशी करत आहेत.
आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख (वय: 20 वर्षे) असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदोरी गावचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसर येथील हांडेवाडी परिसरातील सुंदर सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि शाळेचे दाखले यांची पडताळणी केली. या कागदपत्रांच्या आधारे त्याची मूळ माहिती समोर आली आहे.
आरोपीने मान्य केली अत्याचाराची कबुली:
या घटनेनंतर जेव्हा फिर्यादी पुण्यामध्ये परतले, आणि जेव्हा त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली, तेव्हा ही संतापजनक घटना त्यांच्या निदर्शनास आली. यानंतर, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी राजेश पळसकर आणि इतर स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली. पोलिसांनी यास गांभीर्याने घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.