Navya Nair: दक्षिण भारतातील स्त्रिया केसांमध्ये फुलांचा गजरा घालून सजणे ही केवळ परंपरा नसून त्यामागे एक भावनिक नाळ जोडलेली असते. विशेषतः चमेलीच्या फुलांचा गजरा म्हणजे स्त्रीसौंदर्याचा अविभाज्य भाग मानला जातो. मात्र, हाच गजरा एका भारतीय अभिनेत्रीला ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या अडचणीत आणून गेला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नव्या नायर हिला मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर चमेलीच्या गजऱ्यामुळे तब्बल 1.25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नेमके घडले काय?
नव्या नायर अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या ओणम महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती. प्रवासादरम्यान तिने केसांमध्ये माळण्यासाठी आपल्या वडिलांनी खरेदी केलेला चमेलीचा गजरा सोबत नेला होता. त्यांनी तो दोन भागांमध्ये विभागून दिला होता; एक प्रवासात घालण्यासाठी आणि दुसरा हँडबॅगमध्ये ठेवून पुढील टप्प्यावर वापरण्यासाठी. मात्र, हा छोटासा गजरा मेलबर्न विमानतळावर तिच्यासाठी मोठा त्रास ठरला.
हेही वाचा: पल्लवी जोशी व विवेक अग्निहोत्रींच्या ‘The Bengal Files’ने 3 दिवसांत इतके कोटी कमवले; 50 कोटींचे बजेट कधीपर्यंत वसूल होईल?
ऑस्ट्रेलियाच्या कठोर जैवसुरक्षा कायद्यांनुसार कोणत्याही प्रकारची फुलं, फळं किंवा बियाणं देशात आणणं गुन्हा मानला जातो. याच नियमांमुळे नव्या नायरला AUD 1,980 म्हणजेच सुमारे ₹1.25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, हा दंड 28 दिवसांच्या आत भरावा लागेल.
अभिनेत्रीची प्रतिक्रिया
नव्या नायरने एका सार्वजनिक कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख करताना सांगितलं, 'हे पूर्णपणे माझ्याकडून नकळत झालेलं चुकलं. कायद्याबद्दल अज्ञान हा सबब ठरू शकत नाही. छोट्या 15 सें.मी. गजऱ्यामुळे एवढा मोठा दंड लागला, पण नियम म्हणजे नियमच.'
तिने हेही स्पष्ट केलं की, या प्रसंगामुळे तिच्या ओणमाच्या आनंदावर परिणाम झाला नाही. मेलबर्नमध्ये मल्याळी समुदायासोबत तिने आनंदाने सण साजरा केला. सोशल मीडियावर तिने ओणमच्या उत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांनाही आनंदात सामील केलं.
ऑस्ट्रेलियातील कठोर नियम
ऑस्ट्रेलिया हा जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील देश आहे. तिथे बाहेरील देशांतून आलेल्या अगदी लहानशा वस्तूंनीही परिसंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच विमानतळांवर कडक तपासणी केली जाते. प्रवाशांना प्रत्येक वस्तू घोषित करणं बंधनकारक असतं. नियम मोडल्यास अशा प्रकारचे जड दंड आकारले जातात.
हेही वाचा: Mirzapur Webseries : 'मिर्झापूर' मध्ये आता बबलू पंडितची जागा घेणार हा अभिनेता ; कशी असेल आताची टीम
परंपरा आणि कायदा
या घटनेने परदेशातील कायदे किती वेगळे आणि कठोर असतात हे स्पष्ट केलं. भारतात केसांमध्ये गजरा माळणं हा रोजच्या आयुष्याचा भाग असतो. पण दुसऱ्या देशात हेच परंपरेचं प्रतीक गुन्हा ठरू शकतं.
नव्या नायरच्या या अनुभवाने परदेशात जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना नक्कीच धडा मिळेल. आपल्या सांस्कृतिक गोष्टींचा अभिमान असला तरी त्या देशातील नियम जाणून घेणं तेवढंच आवश्यक आहे.