Shashi Tharoor on Trump's Attitude : भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ वॉर सुरू असताना ट्रम्पच्या बदललेल्या सुरावर शशी थरूर यांनी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या नरमाईच्या भाषेनंतर मोदींनी त्यांना जलद प्रतिसाद दिला आणि दोन्ही देशांच्या राजदूतांनी गंभीर सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगत त्यावरही भर दिला. थरूर म्हणाले की, अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावत जगभरात भारताचा जो अपमान केला आहे, त्यावर अमेरिका आणि ट्रम्प यांना इतक्या लवकर माफ करता आणि विसरता येणार नाही. तसेच, इतक्या सहजासहजी सोडूनही देता येणार नाही.
ट्रम्प यांच्याकडून सुरू झालेल्या टॅरिफच्या कुरापतीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले, त्यानंतर काही तासांनी पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आणि ट्रम्प यांच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले. दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमधील या संवादावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी खूप लवकर प्रतिसाद दिला. परंतु, दोन्ही देशांच्या सरकारांनी आणि राजदूतांनी काही गंभीर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
थरूर यांनी ट्रम्प यांच्या स्वरातील बदलाचे स्वागत केले आणि म्हणाले की, भारतीयांना भोगावे लागलेले परिणाम लक्षात घेता, ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणामुळे होत असलेले दु:ख आणि अपमान इतक्या लवकर माफ करता येणार नाही आणि विसरताही येणार नाही.
हेही वाचा - US Visa Rules: अमेरिकेचा मोठा निर्णय! आता भारतीयांना परदेशात व्हिसा इंटरव्ह्यू देता येणार नाही; NIV इंटरव्यूच्या नव्या अटी लागू
ट्रम्पच्या विधानांमुळे भारत दुखावला आहे - थरूर
थरूर म्हणाले, 'पंतप्रधानांनी खूप लवकर प्रतिसाद दिला आणि परराष्ट्रमंत्र्यांनी मूलभूत संबंधांचे महत्त्व देखील अधोरेखित केले, जे एक व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे आणि अजूनही अस्तित्वात आहे. हा संदेश आपल्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. मला वाटते की, दोन्ही बाजूंच्या सरकारांनी आणि मुत्सद्दींनी काही गंभीर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मी या नवीन संवादाचे सावधगिरीने स्वागत करतो. कोणीही इतक्या लवकर क्षमा करू शकत नाही आणि विसरू शकत नाही कारण भारतीयांना प्रत्यक्षात त्याचे खरे परिणाम भोगावे लागत आहेत आणि या परिणामांवर मात करावी लागेल.'
ते म्हणाले, 'मला वाटत नाही की, आपण 50 टक्के शुल्क किंवा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा केलेला अपमान पूर्णपणे विसरू शकतो. ट्रम्प यांचा स्वभाव खूपच अस्थिर आहेत आणि त्यांनी जे म्हटले आहे, त्यामुळे आपला देश दुखावला गेला आहे आणि तो संतापलाही आहे. 50 टक्के शुल्काने प्रत्यक्षात आधीच परिणाम दाखवले आहेत.'
'भारताने संपूर्ण प्रकरणात परिपक्वता दाखवली आहे'
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी रशियासोबतच्या भारताच्या व्यापार संबंधांवर केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना थरूर म्हणाले, 'मला वाटत नाही की, आपल्याला माफी मागण्याची गरज आहे. भारताने या संपूर्ण प्रकरणात खूप परिपक्वतेने काम केले आहे. तसेच हे विसरू नका की, रशिया आणि तेलाशी व्यापाराला प्रत्यक्षात मागील अमेरिकन सरकारांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी जागतिक तेलाच्या किमती स्थिर करण्यासाठी आम्हाला काही रशियन तेल खरेदी करण्याची विनंती केली होती. दुसरे म्हणजे, चीन आमच्यापेक्षा जास्त रशियन तेल आणि वायू खरेदी करतो. तुर्की आमच्यापेक्षा जास्त रशियन तेल आणि वायू खरेदी करतो. युरोप तेल आणि वायू खरेदी करत नाही, परंतु ते इतर रशियन उत्पादने खरेदी करतात. म्हणूनच ते आमच्यापेक्षा अब्जावधी डॉलर्स रशियाच्या तिजोरीत टाकत आहेत.' यावरून ट्रम्प आणि अमेरिकन राजकारणी भारत आणि भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा - Houthi Attack on Israel Airport : टोकाचा संघर्ष ! इस्राइलच्या विमानतळावर हल्ला, भयंकर व्हिडीओ समोर
ट्रम्पच्या विधानानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
शुक्रवारी यापूर्वी ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांना एक अतिशय खास संबंध म्हणून वर्णन केले होते आणि म्हटले होते की, ते आणि पंतप्रधान मोदी नेहमीच मित्र राहतील, काळजी करण्याची काहीच गरज नाही. ट्रम्पच्या विधानानंतर, पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकनाचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे पूर्ण समर्थन करतो.' भारत आणि अमेरिकेत अतिशय सकारात्मक, दूरदर्शी व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.