मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली. आपल्या विनोदी तसेच गंभीर अभिनयाने मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत अमिट छाप सोडणाऱ्या अशोक सराफ यांना हा सन्मान मिळाल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
अशोक सराफ यांना हा पुरस्कार उशिरा मिळाला का?
अशोक सराफ यांना हा पुरस्कार उशिरा मिळाला का, याबाबत लोकमत फिल्मीने मुलाखती दरम्यान विचारले असता त्यांनी मोठ्या मनाने उत्तर दिले. “पद्मश्री उशिरा मिळाला किंवा लवकर मिळाला, हा प्रश्नच येत नाही. मिळाला, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. अनेक कलाकार या पुरस्कारापासून वंचित राहिले असतील, मीही त्यातलाच एक होतो. पण आता केंद्र सरकारने माझ्या योगदानाची दखल घेतली, हेच पुरेसं आहे. त्यामुळे मला कोणतीही खंत नाही,” असे ते म्हणाले.
हेही वाचा :Chhava Film Shooting Location: छावा चित्रपटाचे शूटिंग कुठे झाले तुम्हाला माहित आहे?
सराफ पुढे म्हणाले, “तुझी वेळ आली, तेव्हा तुला मिळालं. त्यामुळे त्याचं मला काहीही दुःख नाही. हा पुरस्कार मिळावा, असं प्रत्येकालाच वाटतं. पण ‘मला का नाही?’ असा विचार कधीच केला नाही. त्यांनी माझा सत्कार केलाय, याचा जास्त आनंद आहे.”
लहानपणी मिळालेल्या चांदीच्या बिल्ल्याची आठवण काढत ते म्हणाले, “मी वयाच्या सहाव्या वर्षी एकांकिकेत काम केलं होतं, तेव्हा मला चांदीचा बिल्ला मिळाला होता. तिथूनच एक सवय लागली – चांगलं काम केलं तर काहीतरी मिळतं. त्यामुळे मी नेहमी चांगलं काम करायचा प्रयत्न केला आणि ते लोकांना आवडलं पाहिजे, एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
अभिनय हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. “मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. काहीतरी चांगलं केल्याशिवाय काहीच मिळत नाही, हे मी आयुष्यभर अनुभवलं आहे. त्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला, याचा अभिमान आहे,” असे अशोक सराफ यांनी नम्रपणे सांगितले.
हेही वाचा :तंत्रज्ञानावर बनवलेले 'हे' आहेत भारतातील प्रसिद्ध चित्रपट
मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील आधारस्तंभ आहेत. त्यांच्या ‘अशि ही बनवाबनवी’, ‘एक डाव भुताचा’, ‘धूमधडाका’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘झपाटलेला’ यांसारख्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्यांच्या विनोदी शैलीचा आणि सहज अभिनयाचा प्रभाव आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.