Wednesday, September 03, 2025 02:17:04 PM

Alibaug Land: शाहरुख खानच्या लेकीचा पाय खोलात?; जमिनीच्या ना विक्री कलमांतर्गत वाद, ना विक्री कलम नेमकं काय?

अलिबाग तालुक्यातील थळ गावात एक वादग्रस्त जमिनीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या जमिनीची विक्री सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिला झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

alibaug land शाहरुख खानच्या लेकीचा पाय खोलात जमिनीच्या ना विक्री कलमांतर्गत वाद ना विक्री कलम नेमकं काय

मुंबई: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ गावात एक वादग्रस्त जमिनीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. फळबाग लागवडीसाठी सरकारकडून देण्यात आलेली जमीन 'ना विक्री कलम' (No Sale Clause) अंतर्गत येते. त्यामुळे त्या जमीनीची विक्री करता येत नाही. मात्र या जमिनीची विक्री सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिला झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केली आहे. 2023 मध्ये नोंदणीकृत साठे कराराद्वारे जमीन विकली गेली होती. मात्र आता दोन वर्षांनंतर या जमीनीच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

'ना विक्री कलम' (No Sale Clause) काय सांगतो?
सरकार कृषी, फळबाग किंवा विशेष प्रकल्पांसाठी काही जमिनी सशर्त पद्धतीने व्यक्तींना उपलब्ध करुन देतो. अशा जमिनींवर ना विक्री कलम लागू असते. याचा अर्थ, संबंधित जमिनधारकाला ठराविक कालावधीपर्यंत ती जमीन विकता, गहाण ठेवता किंवा हस्तांतरित करता येत नाही. सरकारने ज्या हेतूसाठी जमीन दिली आहे, तो उद्देश पूर्ण व्हावा असा या कलमाचा उद्देश आहे. 

हेही वाचा: Rahul Deshpande Divorce: राहुल देशपांडेंचा घटस्फोट! 17 वर्षांच्या विवाहानंतर नेहा सोबतचा संसाराचा अध्याय संपला
नियम अटी काय असतात? 
साधारणपणे 30 वर्षांपर्यंत जमीन विकण्यास मनाई असते. सरकारने दिलेल्या उद्देशाप्रमाणे जमीन वापरणे (उदा. कृषी, फळबाग लागवड) बंधनकारक असते. जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय जमीनीचा व्यवहार करता येणार नाही. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास जमीन जप्त केली जाऊ शकते किंवा विक्री व्यवहार अवैध ठरवला जातो. 

अलिबाग प्रकरण काय? 
या प्रकरणामध्ये संबंधित जमीन फळबाग लागवडीसाठी देण्यात आली होती. विक्री प्रक्रियेत ना विक्री कलम पाळले नसल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच या व्यवहारात सेलिब्रिटीचे नाव जोडले गेल्याने प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी सुरु केली असून व्यवहार वैध आहे का? नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याचा तपास होणार आहे. 

ना विक्री कलमांतर्गत येणाऱ्या जमीनीचा व्यवहार करताना काय काळजी घ्यावी? 
ना विक्री कलम असलेल्या जमिनींबाबत अनेकदा सामान्य नागरिकांनाही संभ्रम असतो. जर अशा कलमांतर्गत एखादी जमीन देण्यात आली असेल तर...
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ना विक्री कलम स्पष्टपणे नमूद असते. 
परवानगीशिवाय अशा जमीनीची खरेदी-विक्री टाळावी, अन्यथा व्यवहार अवैध ठरतो. 
खरेदी करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महसूल विभागाकडून जमीनीची कायदेशीर स्थिती तपासून घ्यावी. 
चुकीचा व्यवहार झाल्यास जमीन गमावण्याचा धोका तसेच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. 
ना विक्री कलम असलेल्या जमिनींचा व्यवहार नियमांचे उल्लंघन केल्यास तो रद्द होऊ शकतो. त्यामुळे अशा जमिनींची खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर बाबींची नीट खात्री करणे आवश्यक आहे. 


 


सम्बन्धित सामग्री