चंद्रकांश शिंदे. मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एअर इंडिया ही एअरलाइन्स चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. अशातच, एअर इंडिया या एअरलाइन्सबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे एअर इंडियाकडून 8 उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. यमध्ये 4 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. रद्द करण्यात आलेली विमाने चेन्नई, दिल्ली, दुबई, मेलबर्न, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबईतून उड्डाण करणार होती. मिळालेल्या माहितीनुसार, विमानांची तांत्रिक तपासणी, खराब हवामान आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेत, हा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'एअर इंडियाची दुबई ते चेन्नई AI906, दिल्ली ते मेलबर्न AI308 आणि मेलबर्न ते दिल्ली AI309 ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत'.
हेही वाचा: 'या' कारणामुळे पुण्यातील प्रमुख 20 रस्ते आज वाहतुकीसाठी बंद
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 'दुबई-हैदराबाद विमानही रद्द करण्यात आले आहे. पुण्याहून दिल्ली, अहमदाबादहून दिल्ली, हैदराबादहून मुंबई आणि चेन्नईहून मुंबईची फ्लाइटदेखील रद्द करण्यात आली आहे. देखभाल आणि ऑपरेशनल कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे'. यासंदर्भात बोलताना एअरलाइन कंपनीने म्हटले आहे की, 'ज्या लोकांचा प्रवास प्रभावित झाला आहे, त्यांना रिफंड करण्यात येईल. याशिवाय पर्यायी प्रवासाचा प्लॅनही त्यांच्यासोबत शेअर करण्यात येईल. तसेच, या असुविधेबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. प्रवाशांना जलद आणि सुरक्षितपणे आपला प्रवास करता यावा, यासाठी आमचे कर्मचारी पर्यायी हवाई प्रवास प्रदान करण्यास तत्पर आहेत. प्रवाशांना संपूर्ण रिफंड आणि रिशेड्यूलिंगची ऑफर देण्यात येत आहे'.