देहरादून : देहरादून आणि परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने मोठा कहर केला असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण बेपत्ता आहेत. सहस्त्रधारा या पर्यटनस्थळी अवघ्या काही तासांत 192 मिमी पावसाची नोंद झाली. नद्या तुडुंब भरल्याने दुकाने, हॉटेल्स आणि घरे पाण्यात वाहून गेली. टपकेश्वर शिवमंदिर गळणाऱ्या पाण्यात पूर्णपणे बुडाले. हवामान विभागाने देहरादूनसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
जिल्हाधिकारी सविन बन्सल यांच्या माहितीनुसार मृतांपैकी आठ जण टोंस नदीत अडकलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत प्रवासी होते. प्रशासन, एसडीआरएफ आणि पोलिसांनी रात्रीपासून बचावकार्य हाती घेतले असून आतापर्यंत 500 हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पूल व रस्त्यांना मोठे नुकसान झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हेही वाचा : Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी यंत्रणांना मदतकार्य गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याला संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. पौंधा येथील देवभूमी संस्थेत अडकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर मसूरीतील काही हॉटेलमधून पर्यटकांना सुरक्षित बाहेर आणण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून विशेषतः गढवाल भागात पुराचा फटका अधिक बसला आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे रुपये 7,500 कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने तत्पूर्वी रुपये 1,200 कोटींच्या मदतीची घोषणा केली असून नुकसानग्रस्त भागांत मदत आणि पुनर्वसनाची कामे सुरू आहेत.