Hyderabad Bomb Blast Case
Edited Image
Hyderabad Bomb Blast Case: तेलंगणा उच्च न्यायालयाने मंगळवारी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा कायम ठेवली. न्यायालयाने ट्रायल कोर्टाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली. हे दहशतवादी 2013 च्या हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी होते, ज्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 131 जण जखमी झाले होते. 21 फेब्रुवारी 2013 रोजी हैदराबादमधील गर्दीच्या दिलसुखनगर भागात दोन स्फोट झाले होते. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि 131 जण जखमी झाले होते. पहिला स्फोट बस स्टॉपवर झाला आणि दुसरा स्फोट दिलसुखनगरमधील एका ढाब्याजवळ झाला होता.
या प्रकरणाची सुनावणी करताना, न्यायमूर्ती के. लक्ष्मण आणि न्यायमूर्ती पी. श्री सुधा यांच्या खंडपीठाने एनआयए न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यांनी इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. खंडपीठाने म्हटले की, कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवण्यात येते. 13 डिसेंबर 2016 रोजी एनआयए कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनचे सहसंस्थापक मोहम्मद अहमद सिद्दीबापा उर्फ यासिन भटकळ, पाकिस्तानी नागरिक झिया-उर-रहमान उर्फ वकास, असदुल्लाह अख्तर उर्फ हड्डी, तहसीन अख्तर उर्फ एजा शेख आणि मोनू यांना दोषी ठरवले होते.
हेही वाचा - Jaipur Blast Case: जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा
सर्वोच्च न्यायालयात करणार अपील -
एका दोषीच्या वकिलाने सांगितले की, ते या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करतील. तथापी, सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात पत्रकारांना सांगितले की, या प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतला आहे कारण त्यात दहशतवादी कारवाया समाविष्ट आहेत. तसेच सुरुवातीला शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) याची चौकशी केली. मुख्य आरोपी रियाझ भटकळ पाकिस्तानात लपला असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा - 26/11 चा सूत्रधार अखेर भारताच्या तावडीत? तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय
पाचही दोषींना फाशीची शिक्षा -
दरम्यान, सरकारी वकिलांनी सांगितले की, एनआयए प्रकरणांसाठीच्या विशेष न्यायालयाने पाच दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे, कारण हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला आहे. दोषींनी दाखल केलेल्या याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा कायम ठेवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.