Monday, September 01, 2025 04:40:36 AM

जहाल नक्षलवादी हिडमा अटकेत; नक्षलवादी कारवाईत मोठं यश

नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला आणखी एक यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला अटक केली आहे. त्याच्याकडून एके-47 बंदुकांसोबत मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली.

जहाल नक्षलवादी हिडमा अटकेत नक्षलवादी कारवाईत मोठं यश

कोरापूट: नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला आणखी एक यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला अटक केली आहे. यादरम्यान, त्याच्याकडून एके-47 बंदुकांसोबतच मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजम हिडमाला ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील बैपारीगुडा पोलिसांनी पेटगुडा जंगलातून अटक केली. कोरापूट पोलिस आणि डीव्हीएफच्या संयुक्त कारवाईत त्यांना यश मिळाले.

28 मे रोजी रात्री डीव्हीएफ टीमने एक विशेष शोध मोहीम सुरू केली. सकाळी नक्षलवाद्यांचा एक गट टेकडीवर तळ ठोकताना या डीव्हीएफ टीमला दिसला. नक्षलवाद्यांना घेराव घालण्यासाठी जेव्हा डीव्हीएफ टीम पुढे आली, तेव्हा नक्षलवाद्यांनी डीव्हीएफ टीमवर गोळीबार सुरू केला आणि जंगलात पळून गेले. गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून डीव्हीएफ टीमने देखील गोळीबार केला. यादरम्यान, झुडपात लपण्याचा प्रयत्न करणारे माओवादी पकडले गेले.

हिडमाला अटक करण्यात यश:

दरम्यान, डीव्हीएफ टीमने कुंजम हिडमा नावाच्या कट्टर नक्षलवाद्याला अटक करण्यात यश मिळवले. कुंजम हिडमाकडून डीव्हीएफ टीमने एके-47 रायफल, 35 जिवंत काडतुसे, 27 इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 90 नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 2 किलो गन पावडर, 2 स्टील कंटेनर, 2 रेडिओ, 1 इअरफोन, 1 मोटोरोला वॉकी-टॉकी, 10 बॅटरी, 2 चाकू, 1 कतुरी (लहान कुऱ्हाड), 4 टॉर्च लाईट, 15 माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या.

कोण आहे कुंजम हिडमा?

कुंजम हिडमा उर्फ मोहन हा नक्षली चळवळीतील एरिया कमिटी सदस्य होता. 2007 मध्ये, वयाच्या 14 व्या वर्षी, तो नक्षलवादी सांस्कृतिक शाखा बाल संघम आणि जन नाट्य मंडळीमध्ये सहभागी झाला. सांस्कृतिक सहभागातून, तो लष्करी प्रशिक्षण आणि नक्षलवादी कारवायांमध्येही सहभागी झाला. 2013 ते 2015 या कालावधीत कुंजम हिडमाने उसुर लोकल ऑर्गनायझेशन स्क्वॉड म्हणून पक्षातील सदस्य म्हणून काम केले. लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याला एक शॉर्ट रायफल देण्यात आली. 2016 मध्ये, हिडमा आंध्र प्रदेश सीमेवर एका प्लाटूनमध्ये कार्यरत होता. 2019 मध्ये त्याला एरिया कमिटी मेंबर म्हणून बढती देण्यात आली. चांदमेटा, कोंडाझारी, कुंभीखारी, कोलेंगडब्बा येथील नक्षली हल्ल्यात हिडमा सामील होता.


सम्बन्धित सामग्री