नवी दिल्ली: भारतामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण असलेलं राज्य म्हटलं की अनेकदा केरळचं नाव घेतलं जातं. मात्र, ‘पूर्ण साक्षर राज्य’ असा किताब पटकावणाऱ्या पहिल्या राज्याच्या यादीत आता मिझोरामनं आपलं नाव कोरलं आहे. ही बाब केवळ मिझोरामसाठीच नाही, तर संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाची आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ही अधिकृत घोषणा केली आहे की मिझोराम हे भारताचं पहिलं अधिकृत पूर्ण साक्षर राज्य ठरलं आहे.
ULLAS – नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत ही महत्त्वाची कामगिरी पार पाडण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती दिली. या ऐतिहासिक क्षणानिमित्ताने मिझोरामची राजधानी ऐझॉल येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यात भारत सरकारचे शिक्षण राज्यमंत्री आणि कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच मिझोरामचे मुख्यमंत्री पु लालदुहोमा यांची उपस्थिती लाभणार आहे.
ULLAS (Understanding Lifelong Learning for All in Society) हा कार्यक्रम 15 वर्षे आणि त्यावरील वय असलेल्या अशिक्षित व्यक्तींना लिहिणे, वाचणे, मोजणे आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमांतर्गत मिझोराममध्ये प्रभावीपणे साक्षरता अभियान राबवण्यात आलं. स्थानिक स्वयंसेवक, शिक्षक, सरकारी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम व्यापक प्रमाणावर यशस्वी करण्यात आला.
हेही वाचा: Upcoming IPOs: पुढील आठवड्यात पाच नवीन आयपीओ आणि दोन सूचीबद्ध होणार; संपूर्ण यादी जाणून घ्या
मिझोराममध्ये साक्षरतेसाठी असलेली जनजागृती, स्थानिक नागरिकांची इच्छाशक्ती आणि शासनाची धोरणात्मक अंमलबजावणी या सर्व घटकांनी एकत्र येत साक्षरतेच्या या यशस्वी टप्प्यापर्यंत राज्याला पोहोचवलं आहे. विशेषतः महिलांचा आणि आदिवासी समाजाचा सहभागही मोठ्या प्रमाणावर लाभला.
ही कामगिरी इतर राज्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरू शकते. भारतात अजूनही अनेक भाग अशिक्षिततेच्या अंधारात अडकलेले आहेत. मात्र, मिझोरामने दाखवलेला मार्ग स्वीकारल्यास, संपूर्ण देश साक्षरतेच्या प्रकाशाकडे वाटचाल करू शकतो.
शिक्षण म्हणजे केवळ शाळेच्या चार भिंतींतील गोष्ट नसून, तो जीवनाचा मूलभूत हक्क आहे. मिझोरामने हे सिद्ध केलं की योग्य नियोजन, प्रयत्न आणि लोकसहभागाच्या जोरावर साक्षरतेचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं शक्य आहे.
मिझोरामला ‘पूर्ण साक्षर राज्य’ घोषित करण्यात आल्याने भारताच्या शिक्षण प्रवासात उज्वलतेकडचा, समतेकडचा आणि प्रगतीकडचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे.