मुंबई: दिवस उजाडल्यावर अनेकजण कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवास करतात. यामुळे, बऱ्याचदा रोडवर ट्रॅफिक निर्माण होतो. यामुळे अनेकांची तारांबळ उडते. ट्रॅफिकमुळे, दहा मिनिटांच्या अंतरावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना कधीकधी आर्ध्याहून जास्त तास लागतो. त्यामुळे, प्रवासी संतप्त होतात आणि त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. मात्र, यात एक नवीन ट्विस्ट आला आहे. ते म्हणजे, हा ट्रॅफिक चक्क एका महिलेमुळे झाला आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या महिलेने नेमके काय केले? तर विषय असा आहे की या महिलेला 2 पाणीपुरी कमी मिळाले. चला तर जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण.
ही घटना गुजरात राज्यातील वडोदरा शहरात घडली आहे. वडोदरा शहरातील सूरसागर तलावाजवळ एक महिला पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. साधारणत: 20 रुपयात किमान 6 पाणीपुरी मिळते. मात्र, पाणीपुरी विक्रेत्याने या महिलेला फक्त 4 पाणीपुरीच दिले. त्यामुळे, महिलेचा राग अनावर झाला आणि तिने टोकाची भूमिका घेतली. ही महिला चक्क रस्त्यावर बसली आणि ठिय्या आंदोलन करायला सुरूवात केली.
हेही वाचा: The Great Khali Meets His Match : 17 वर्षीय करण सिंगची उंची पाहून खलीदेखील झाला अवाक्; WWE सुपरस्टार बनवण्याचं दिलं आश्वासन
आंदोलन करताना महिला म्हणाली, 'मला दोन पाणीपुरी आणखी द्या, नाहीतर हा ठेला इथून काढून टाका'. या आंदोलनादरम्यान, ती महिला एखाद्या लहान मुलीसारखी अट्टाहास करू लागली. या घटनेमुळे, थोड्याच वेळात ट्रॅफिक जाम झाला. या घटनेबद्दल जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली, तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ती महिला काही ऐकायला तयार नव्हती.
ती महिला रडत रडत म्हणाली की, 'हा पाणीपुरीवाला सर्वांना 6 पाणीपुरी देतो आणि मला 2 पाणीपुरी कमी देतो. इतकंच नाही, तर तो माझ्याशी अरेतुरे करतो. याऊलट माझ्याशी भांडतो. याचा ठेला बंद करा'. या महिलेचा अट्टाहास पाहून सर्वजण खळखळून हसत होते. तब्बल एक तासांहून अधिक वेळ या महिलेने केलेल्या गोंधळामुळे पोलिसही हैराण झाले. अखेर, पोलिसांनी या महिलेला समजून सांगण्यात आणि रस्ता मोकळा करण्यात यशस्वी झाले.