मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाचे विधिमंडळात आदित्य ठाकरे नेतृत्व करणार आहेत. या गटाच्या प्रतोदपदी सुनिल प्रभू यांची नियुक्ती झाली आहे. पण पक्षाबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. सध्या उद्धव ठाकरे विधान परिषद या ज्येष्ठांच्या सभागृहाचे सदस्य आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाने 20 जागा जिंकल्या. यातल्या दहा जागा फक्त मुंबईतल्या आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आता पुढे काय करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी 'मराठी माणूस' या मुद्याचे भावनिक राजकारण नव्याने करण्याचे संकेत दिले आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मविआला 288 पैकी 46 जागा जिंकता आल्या. उद्धव ठाकरेंच्या गटाला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या गटाला 10 जागा जिंकणे जमले. निवडणुकीत एवढी वाईट परिस्थिती झाल्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा परंपरागत राजकारणाकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष चालत होता त्यावेळी मराठी माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. नंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी जवळीक साधली आणि मराठी माणूस, हिंदुत्व या मुद्यांवर आक्रमक राजकारण करणे थांबवले. यातून पक्षातले बहुसंख्य सदस्य नाराज झाले. पुढे निवडणुकीत पक्षाला जबर फटका बसला. या सगळ्याची जाणीव झाल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी परंपरागत राजकारणाकडे वळण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यातील दहा जागांवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा विजय झाला. यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून 'मराठी माणूस' या मुद्याचे भावनिक राजकारण नव्याने करण्याच्या तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराती संघर्ष पेटवण्याचे काम उद्धव यांच्या गटाने केले. त्याचा फायदा सर्वाधिक त्यांनाच झाला. आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि अचानक सगळ्या मराठी नेत्यांना एकत्र यायचे आवाहन केलं आहे. संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. राज ठाकरे यांच्यासह सगळ्या मराठमोळ्या नेत्यांनी एकत्र यावं अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.