Apple iPhone 17: अॅपलच्या आयफोन 17 सिरीजची भारतातील विक्री शुक्रवारी सुरू होताच मुंबई आणि दिल्लीतील स्टोअर्सबाहेर प्रचंड गर्दी उसळली. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील अॅपल स्टोअरबाहेर गुरुवारी रात्रीपासूनच रांग लागली होती.
शुक्रवारी सकाळी विक्री सुरू होताच पहिल्यांदा आयफोन घेण्यासाठी धावपळ झाली. यावेळी रांगेत उभ्या असलेल्या दोन व्यक्तींमध्ये वाद वाढून टोकाला गेला. एका व्हिडिओमध्ये काही जण एकमेकांना मारताना दिसत आहेत, तर इतर ग्राहकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षारक्षकांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. या घटनेमुळे काही वेळ रांगेत अडथळा निर्माण झाला.
हेही वाचा:Apple iPhone 17 Launch : ॲपल आयफोन 17 खरेदीसाठी मुंबई, दिल्लीसह विविध शहरात स्टोअर्सबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी
ग्राहकांमध्ये मात्र नवीन सिरीजबाबत प्रचंड उत्साह दिसून आला. जोगेश्वरीहून आलेल्या एका ग्राहकाने सांगितले, “मी पहाटे तीन वाजल्यापासून रांगेत उभा आहे. या फोनसाठी सहा महिन्यांपासून प्रतीक्षा करत होतो.” तर आणखीन एका ग्राहकाने सांगितले, “मी ऑरेंज आयफोन 17 प्रो मॅक्स घेण्यासाठी रात्री आठ वाजल्यापासून थांबलो आहे. यावेळी कॅमेरा, बॅटरी आणि डिझाइनमध्ये मोठे बदल झाले आहेत.”
दिल्लीतील साकेत येथील अॅपल स्टोअरबाहेरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. मॉलच्या बाहेरून आतपर्यंत ग्राहकांची रांग लागली होती.
हेही वाचा:US On Gaza Ceasefire : गाझा युद्धबंदी ठरावाला अमेरिकेचा सहाव्यांदा व्हेटो; पॅलेस्टिनी जनतेवर संकट कायम
आयफोन 17 सिरीजमध्ये A19 बायोनिक चिप, अधिक क्षमतेची बॅटरी आणि नव्याने डिझाइन केलेला लूक ही वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने या सिरीजची किंमत 82,900 रुपयांपासून 2,29,900 रुपयांपर्यंत जाहीर केली आहे. प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांना पहिल्याच दिवशी फोन मिळू लागला असून, बाजारपेठेत या मॉडेलला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.