मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवार १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील निर्मलनगर येथे हत्या करण्यात आली. या प्रकरणात बाबा सिद्दिकींच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस शिपाई (पोलीस कॉन्स्टेबल) शाम सोनावणे यांना निलंबित करण्यात आले आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका पोलीस शिपायाकरवी (पोलीस कॉन्स्टेबल) संरक्षण दिले जात होते.
फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. व्यवस्थित दिसत नव्हते त्यामुळे प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला नाही, असा दावा निलंबित शाम सोनावणे यांनी केला. हा दावा नोंदवून घेतला पण कामात चूक झाल्याचे आढळून आले म्हणून वरिष्ठांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात शाम सोनावणे यांचे निलंबन केले.
पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देशाच्या विविध भागात आरोपींचा शोध घेत आहेत.