प्राची ढोले मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात देवाभाऊंच्या कार्यामुळे, कतृत्वामुळे, प्रभावामुळे ते "किंगमेकर" म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या रणनीतीने अनेक राजकीय घडामोडींत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यामध्ये देवाभाऊंचे महत्त्व अधिक वाढले आहे, आणि त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसह जनसामांन्यांमध्ये वाढत चालला आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या पक्षांची ताकद वाढवण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यांचा राजकीय दृष्टिकोन आणि वागण्याची शैली त्यांना "किंगमेकर" ठरवते. महाराष्ट्रातील आगामी राजकीय घडामोडींत देवाभाऊंची भूमिका ही महाराष्ट्राच्या केंद्रबिंदू म्हणून महत्त्वाची ठरत आहे.
आज मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधीमंडळ गटनेतेपदासाठी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, मेघना बोर्डीकर, योगेश सागर, गोपीचंद पडळकर आणि आशिष शेलार यांसारख्या भाजप नेत्यांनी अनुमोदन दिले.
सत्तास्थापनेसाठी महायुतीचा दावा
देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवडीमुळे ते लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी साडे तीन वाजता सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे.
राज्यपालांची भेट आणि सत्तास्थापनेची दावा
भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे तिघेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. यावेळी सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र राज्यपालांना दिले जाईल आणि त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला जाईल.
पनवेल मध्ये भाजपा पदाधिकारींनी धरला ठेका
भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची गटनेतापदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झालं आहे. भाजपाच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. पनवेलमध्ये भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरला. तसेच फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला.
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होताच सोलापुरात भाजपचा जल्लोष
विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. भाजप कार्यालयाजवळ फटाके फोडून, मिठाई वाटत, ढोल-ताश्यांच्या गजरात उत्साह व्यक्त करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवली. ढोल-ताश्यांच्या गजरात नाचत, गाण्यांच्या तालावर जल्लोष साजरा केला. "देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि राज्यातील विकासकामांना गती मिळेल. त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे." सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आगामी काळातील सकारात्मक बदलांसाठीचा आनंद व्यक्त करणारा ठरतांना दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याने जळगावात जल्लोष
जळगाव शहरातील भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल-ताशांच्या तालावर नृत्य केले. परिसर फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा आनंदोत्सव साजरा केला. "देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल. त्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे."
देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवडीचा जालन्यात जल्लोष
मुंबईतील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचे गटनेते म्हणून निवड झाल्यानंतर जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, एकमेकांना पेढे भरवले, आणि जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी "देवेंद्र फडणवीस आगे बढो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उत्साहाने भारलेल्या वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि सर्वांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, "त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात नवीन विकासाची दिशा ठरवली जाईल."