Tsunami Warning: प्रशांत महासागराच्या परिसरात मंगळवारी एक भीषण नैसर्गिक आपत्ती घडली आहे. रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या कामचटका द्वीपकल्पात तब्बल 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून, यामुळे त्सुनामीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांनंतर रशिया, जपान आणि अमेरिकेच्या हवाई बेटांवर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने या भूकंपाचे केंद्र समुद्राखाली असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे त्सुनामीची शक्यता अधिकच वाढली आहे. या भूकंपाची तीव्रता एवढी प्रचंड होती की, अनेक देशांच्या किनारपट्टी भागात हादरे जाणवले. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि सरकारे सतर्क झाली असून, नागरिकांना समुद्राच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रशासन सतर्क; टास्क फोर्स कार्यरत
जपान सरकारने या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष टास्क फोर्स स्थापन केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, लोकांचे स्थलांतर, मदत कार्य आणि किनारपट्टी परिसरांतील हालचालींवर नियंत्रण ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता, अधिकृत सुचनांचं पालन करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.दरम्यान, हवाई बेटांवरील किनारपट्टी भागातही त्सुनामीचा इशारा दिला गेला आहे. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरच्या अहवालानुसार, समुद्राच्या तळाखालून निर्माण होणाऱ्या लाटांमुळे किनारपट्टीला मोठे नुकसान होऊ शकते. विशेषतः हवाई, अलास्का आणि जपानसारख्या भागांमध्ये लाटांची उंची वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
हेही वाचा: Asia Cup 2025: पाकिस्तानशी सामना? शहिदांच्या भावना विसरला आहात का? संसदेत ओवैसींचा सवाल
भीतीचे वातावरण; जनजीवन विस्कळीत
या भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी लोकांनी इमारतींमधून बाहेर धाव घेतली. काही ठिकाणी भूकंपाच्या धक्क्यांचे व्हिडीओ आणि फोटोही समोर आले आहेत, ज्यातून धक्कादायक दृश्ये पाहायला मिळत आहेत. शाळा, कार्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुढील काही तास अत्यंत महत्वाचे
भूकंपानंतरची स्थिती पाहता, पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. त्सुनामीची लाटेची दिशा, वेग आणि प्रभाव क्षेत्राचे अंदाज घेतले जात आहेत. समुद्राच्या किनाऱ्यांजवळ असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती नाही, मात्र या तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व संबंधित देश आपत्कालीन यंत्रणांद्वारे सतर्कतेने परिस्थिती हाताळत आहेत.