मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी पदाचा राजीनामा देणार आहेत. ते राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटून राजीनामा सुपूर्द करतील. यानंतर परंपरेनुसार राज्यपाल शिंदेंची काळजीवाहू मुख्यमंत्री या पदावर नियुक्ती करतील. नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहतील.
सध्या कार्यरत असलेल्या विधिमंडळाचा कार्यकाळ मंगळवारी संपणार आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी राजीनामा देतील. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी अद्याप सत्ता स्थापनेसाठी कोणीही औपचारिक दावा केलेला नाही. यामुळे राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहण्याची शक्यता आहे.
विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाने 132, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 अशा प्रकारे महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाने राज्यातली त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यामुळे भाजपाचे अनेक आमदार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे यासाठी आग्रही आहेत तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेने उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांचे आमदार शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत.
विधानसभा निवडणुकीत मविआने जिंकल्या 46 जागा
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मविआला 288 पैकी 46 जागा जिंकता आल्या. उद्धव ठाकरेंच्या गटाला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या गटाला 10 जागा जिंकणे जमले.