Sunday, August 31, 2025 06:42:04 AM

राष्ट्रवादीच्या बाबा सिद्दीकींची हत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व भागात हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या दिशेने दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी सिद्दीकी यांच्या छातीत लागली.

राष्ट्रवादीच्या बाबा सिद्दीकींची हत्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व भागात हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या दिशेने दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी सिद्दीकी यांच्या छातीत लागली. गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांचा थोड्या वेळात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू आहे. याआधी गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. पण गोळी छातीत लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या वादातून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान शिउबाठाच्या वरुण सरदेसाई यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी करत होता. पण राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच झिशानच्या वडिलांची हत्या करण्यात आली.

नेमके काय घडले ?

पंधरा दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
शनिवारी बाबा सिद्दीकी निर्मलनगर कार्यालयात उपस्थित होते.
सिद्दीकींच्या कार्यालयाच्या बाहेर हल्लेखोर दबा धरून होते.
हल्लेखोरांमधील एक आरोपी अल्पवयीन आहे.
फटाक्याच्या आवाजाचा फायदा उचलत रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार केला.
सुमारे तीन गोळ्या सिद्दीकी यांच्या दिशेने चालवण्यात आल्या.
तीनपैकी एक गोळी सिद्दीकी यांच्या छातीत लागली.
अतिरक्तस्त्रावाने सिद्दीकी यांची शुद्ध हरपली.
उपचारांसाठी त्यांना लिलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं
मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. 
बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. 

कोणी केली हत्या ?

बाबा सिद्दीकी यांची हत्या एका बड्या टोळीने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी एक जण हरियाणाचा आहे आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

कोण होते बाबा सिद्दीकी ?

बाबा सिद्दीकी तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ते काही काळ अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री आणि म्हाडाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. याआधी विद्यार्थी नेता म्हणून सुरुवात करणाऱ्या बाबा सिद्दीकी यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून चांगले काम केले. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पक्षाने आमदारकीचे तिकीट दिले. बाबा सिद्दीकी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये आमदार झाले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने २०१८ मध्ये बाबा सिद्दीकी यांची ४६२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. बॉलिवूडमधील संपर्क आणि राजकीय वर्तुळातला प्रभाव यामुळे बाबा सिद्दीकी लोकप्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाने मुसलमान चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी यांना राजकारणात वारंवार संधी दिली, असेही राजकीय अभ्यासक सांगतात. फेब्रुवारी २०२४ मध्ये बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काही महिन्यांनी झिशान सिद्दीकी यांनी उघडपणे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांच्या मंचावर उपस्थित राहून मविआ नेत्यांवर टीका केली होती. 


सम्बन्धित सामग्री