Monday, September 01, 2025 05:27:39 AM

सत्ता स्थापनेचे सूत्र ठरले, अजित पवारांचा गौप्यस्फोट

दिल्लीत गुरुवारी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जाणार आहे. या भेटीत चर्चा करू लवकरच मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले.

सत्ता स्थापनेचे सूत्र ठरले अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : दिल्लीत गुरुवारी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जाणार आहे. या भेटीत चर्चा करू लवकरच मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यात नवे सरकार स्थापन होईल. पुढील दोन ते चार दिवसांत सगळे चित्र स्पष्ट होईल, असेही अजित पवार म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्राने मंत्रिमंडळ तयार करण्याबाबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबतच्या चर्चेत शिक्कामोर्तब झाल्यानंतर महायुती सरकारच्या शपथविधीचा दिवस आणि वेळ जाहीर होईल.

याआधी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकार स्थापन करताना माझी अडचण होणार नाही. या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आहे. आता पंतप्रधान जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिंदेंनी केलेल्या घोषणेनंतर महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंचे जाहीर आभार मानले. 

राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार ?

महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचा प्रत्येकी एक नेता उपमुख्यमंत्री होईल, असे सूत्रांकडून समजते. प्रत्येकी सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार महायुतीतील पक्षांना मंत्रिपदांचे वाटप होणार आहे, असेही सूत्रांकडून समजते. या संदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारला असताना आधी मुख्यमंत्री ठरेल नंतर मुख्यमंत्री मंत्री ठरवतील, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. थोडं थांबा; असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच'

नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 132 जण निवडून आले. या व्यतिरिक्त निवडणुकीत जिंकून आलेल्या पाच जणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 वर जाऊन पोहोचले आहे. राज्याच्या विधानसभेतील 288 पैकी 137 जागा भाजपाच्या आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वैयक्तिक मत असल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भाजपाच्या पक्ष शिस्तीनुसार राज्यात नेतृत्व कोण करणार ? या प्रश्नाचे उत्तर मोदी - शाह यांच्याकडून मिळेल अथवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला जाईल. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतून ठरेल. पण वैयक्तिक मतानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल

  1. एकूण 288 जागा
  2. महायुती 230 जागांवर विजय
  3. भाजपा 132 जागांवर विजय
  4. शिवसेना 57 जागांवर विजय
  5. राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
  6. महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
  7. उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
  8. काँग्रेस 16 जागांवर विजय
  9. शरद पवार गट 10 जागांवर विजय
  10. इतर 12 जागांवर विजय

जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे. 


सम्बन्धित सामग्री