मुंबई : विधानसभा निवडणुकीत मविआचा दारुण पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या गटाला जबर फटका बसला. यातून सावरुन पुन्हा उभे राहण्यासाठी उद्धव ठाकरे 'मराठी माणूस' या मुद्याचे भावनिक राजकारण नव्याने करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मविआला 288 पैकी 46 जागा जिंकता आल्या. उद्धव ठाकरेंच्या गटाला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या गटाला 10 जागा जिंकणे जमले. निवडणुकीत एवढी वाईट परिस्थिती झाल्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा परंपरागत राजकारणाकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष चालत होता त्यावेळी मराठी माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. नंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी जवळीक साधली आणि मराठी माणूस, हिंदुत्व या मुद्यांवर आक्रमक राजकारण करणे थांबवले. यातून पक्षातले बहुसंख्य सदस्य नाराज झाले. पुढे निवडणुकीत पक्षाला जबर फटका बसला. या सगळ्याची जाणीव झाल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी परंपरागत राजकारणाकडे वळण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यातील दहा जागांवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा विजय झाला. यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून 'मराठी माणूस' या मुद्याचे भावनिक राजकारण नव्याने करण्याच्या तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराती संघर्ष पेटवण्याचे काम उद्धव यांच्या गटाने केले. त्याचा फायदा सर्वाधिक त्यांनाच झाला. आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि अचानक सगळ्या मराठी नेत्यांना एकत्र यायचे आवाहन केलं आहे. संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. राज ठाकरे यांच्यासह सगळ्या मराठमोळ्या नेत्यांनी एकत्र यावं अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.
राज यांच्या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरेंना फायदा झाला. मनसेच्या उमेदवारांमुळे शिंदेंचे नुकसान झाले आहे. मुंबईत मनसेमुळे शिंदेंचे चार उमेदवार हरले. मनसेमुळे जिथे शिंदेंचे उमेदवार हरले तिथे उद्धव यांचे उमेदवार जिंकलेत. राज्यभरात मनसेमुळे शिंदेंना दहा जागांचे नुकसान झाले आहे. यामुळे तब्बल एकोणीस वर्षांनंतर उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची आठवण झाली आहे. भाजपाने ठाकरेंचा अपमान केला अशी मांडणी करुन उद्धव ठाकरे भावनिक राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
जर उद्धव आणि राज एकत्र आले तर एकोणीस वर्षांनंतर महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा संघर्ष संपेल. राज्यात मराठी मतांसाठी एकच पक्ष पर्याय ठरेल. मराठी मतपेढीचा फायदा ठाकरेंना मिळवता येईल. मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्याची संधी ठाकरे बंधूंना उपलब्ध होईल. नाहीतर ठाकरे नावाची राजकीय जादू मुंबई महापालिकेतून निघून जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. उद्धव सध्या स्वतःच्या फायद्यासाठी साद घालत असले तरी पुढे साथ देतील याची खात्री राज ठाकरेंनाही वाटत नाही. याच कारणामुळे अद्याप राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेने उद्धव यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही.
मनसे आणि उद्धव ठाकरेंचा गट या दोघांचे राजकारण परस्पर विरोधी अशा स्वरुपाचे आहे. सध्याच्या राजकारणात आदित्य ठाकरे हे अमित ठाकरेंना वरिष्ठ झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत राज उद्धव यांच्याशी हातमिळवणी करुन कायमचे कनिष्ठ पद स्वीकारण्याची शक्यता दुर्मिळ आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे उद्धव यांनी आवाहन केले तरी राज त्यांना साथ देणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.