Sunday, August 31, 2025 04:45:09 AM

Fennel and Sugar Candy in Hotel : हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर का देतात? जाणून घ्या, याच्यामुळे कोणते फायदे होतात..

सर्वांनाच जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर खायला आवडते. जेवल्यानंतर ती चघळणे किंवा चावून खाणे यामागे काही खास कारण आहे का?

fennelsugar candy in hotel  हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर का देतात जाणून घ्या याच्यामुळे कोणते फायदे होतात

Fennel and Sugar Candy in Hotel: हल्ली अनेकजण जेवण्यासाठी किंवा अल्पोपाहारासाठी हॉटेलमध्ये जातात. तिथे खाऊन झाल्यानंतर बडीशेप-खडीसाखर देतात. सर्वांनाच जेवणानंतर ती खायला आवडते. पण जेवल्यानंतर बडीशेप-खडीसाखर चघळणे किंवा चावून खाणे यामागे काही खास कारण आहे का?

अगदी सर्वच हॉटेलमध्ये रिसेप्शन किंवा पेमेंट काऊंटरला बडीशेप-खडीसाखर ठेवलेली असते. मोठ्यांसोबत लहान मुलांनाही ती खायला आवडते. पण ही पद्धत किंवा परंपरा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

हॉटेलमधील मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा, गॅस किंवा अपचन जाणवू शकते. अशा परिस्थितीत बडीशेपमध्ये असलेले नैसर्गिक तेल अ‍ॅनेथॉल पाचक रस आणि एन्जाइम्सच्या स्रावाला उत्तेजन देतं. ज्यामुळे अन्नाचं जलद आणि चांगलं पचन होण्यास मदत होते. तर खडीसाखर पोट थंड ठेवते ज्यामुले आम्लपित्तची समस्या होत नाही.

हेही वाचा - Diet For Kidney Health: किडनी निकामी होण्याचा धोका टाळायचाय? 'या' 5 पदार्थांचा आहारात करा समावेश

मसालेदार अन्न, विशेषतः लसूण आणि कांदा असलेले अन्न यामुळे तोंडात दुर्गंधी येऊ शकते. पण बडीशेपमधील नैसर्गिक तेल तोंडाची दुर्गंधी दूर करतं, फ्रेश वाटतं. तर खडीसाखर तोंड स्वच्छ करून बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. म्हणूनच बडीशेप-खडीसाखरेला नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हटले जाते.

याशिवाय, चुकीचा आहार आणि बिघडत चाललेली जीवनशैली यांचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. त्यामुळे केवळ हॉटेलमध्येच नाही, तर नेहमीच्या जेवणानंतरही बडीशेप-खडीसाखर खाणे खूप चांगले ठरते. जास्त तळलेले, मसालेदार अन्न, जंक फूड खाणे, जास्त गोड किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाणे, जास्त कॅफिन किंवा अल्कोहोल पिणे यामुळे पचनसंस्था बिघडते. वाईट जीवनशैली, पुरेसे पाणी न पिणे, उशिरापर्यंत जागणे आणि वेळेवर न झोपणे, न चावता भरभर खाणे, ताणतणाव आणि खराब मानसिक स्थिती यांचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त अँटीबायोटिक्स किंवा औषधे घेतल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया देखील मरतात आणि पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया खराब झाल्यामुळे लोकांना काहीही खाल्ल्यानंतर गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटात आम्लता यासारख्या समस्या येऊ लागतात. अर्थातच, जर, तुम्हाला तुमची पचनक्रिया सुधारायची असेल तर तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतील. पण यासोबतच बडीशेप-खडीसाखर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ म्हणतात की, जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर, तुम्ही बडीशेपसोबत खडीसाखरेचे सेवन करावे. बडीशेप आतड्यांचे आरोग्य सुधारतं आणि पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढवतं. खडीसाखर त्याचा प्रभाव संतुलित करते आणि शरीराला ऊर्जा देतं. बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा एक हलका आणि आरोग्यदायी पर्याय आहे. याच्यामुळे पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतील.

हेही वाचा - Pumpkin Seeds Benefits: मधुमेह नियंत्रणापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत भोपळ्याच्या बिया आहेत वरदान!

भारतीय संस्कृतीत जेवणानंतर पाहुण्यांचं तोंड गोड करण्यासाठी बडीशेप खडीसाखर देणं हा पाहुणचाराचा एक भाग आहे. यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आणि पाहुणचाराचा भाग म्हणून ती दिली जाते. तेव्हा, हा खाद्यपदार्थांसोबतच आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री