Low Blood Pressure In Youth : रक्तदाब अचानक कमी होणे, ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. सामान्य रक्तदाब 120/80 mmHg असतो, पण तो 90/60 mmHg पेक्षा कमी झाल्यास त्याला 'लो बीपी' किंवा हायपोटेन्शन म्हणतात. प्रौढांमध्ये रक्तदाब अचानक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर ठरू शकते. हल्ली तरुणांमध्येही याची लक्षणे दिसू लागली आहेत. रक्तदाब अचानक कमी होणे, ही तरुणांमध्येही एक गंभीर स्थितीच आहे. याची कारणे काय आहेत, जाणून घेऊ..
रक्त कमी होणे : एखाद्या मोठ्या अपघातातून, अंतर्गत रक्तस्रावामुळे किंवा गंभीर दुखापतीमुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. तसेच, आहार व्यवस्थित नसेल किंवा एकंदरित आहारच आवश्यकतेच्या मानाने कमी असेल किंवा आहार पुरेसा पोषक नसेल, तर शरीरात रक्ताची कमतरता तयार होते. या सर्व कारणांमुळे रक्तदाब मोठ्या प्रमाणात घटतो.
मानसिक कारणे : कधी-कधी एखाद्या गोष्टीचे खूप टेन्शन घेणे, स्ट्रेस, चिंता, अचानक जेवण कमी होणे, मोठा धक्का बसणे ही देखील रक्तदाबाच्या समस्येची कारणे असू शकतात.
हेही वाचा - गरोदरपणात या गोष्टीचा बाळाच्या मनावर होतो वाईट परिणाम; मूल भित्रे होऊ शकते
गंभीर संसर्ग : शरीरात कोणताही गंभीर संसर्ग झाल्यास, त्याला सेप्सिस म्हणतात. सेप्सिसमुळे रक्तदाबात जीवघेणी घट होऊ शकते, ज्याला सेप्टिक शॉक असे म्हणतात. या स्थितीत रक्तदाब इतका कमी होतो की शरीराच्या अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. यामुळे शरीरातील अवयवांवरही दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
औषधांचे साईड इफेक्टस : उच्च रक्तदाबासाठी, मूत्रवर्धक, काही हृदयविकाराची औषधे किंवा नैराश्यावरील औषधे घेतल्याने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो.
हृदयाशी संबंधित समस्या : हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयाचे झडपांचे आजार, हृदयविकाराचा झटका किंवा हृदय पुरेसे रक्त पंप करू शकत नसणे यामुळे रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो.
अंतःस्रावी ग्रंथींशी संबंधित समस्या : अंतःस्रावी ग्रंथी शरीरात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, हे आपल्याला माहीतच आहे. या ग्रंथींच्या कार्यात काही अडथळा निर्माण झाला किंवा या स्रावांचे संतुलन बिघडले, तर त्याचा शरीराच्या प्रत्येक कार्यावर परिणाम होतो. अॅड्रेनल ग्रंथीच्या समस्या, थायरॉइडचे विकार किंवा रक्तातील साखर कमी होणे यामुळेही रक्तदाब कमी होऊ शकतो.
हेही वाचा - Office Stress : कामामुळे ताण वाढतोय? फक्त 10 मिनिटे करा ही 3 योगासने; लगेच मिळेल आराम
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.)