प्रफुल खंडारे. प्रतिनिधी. बुलढाणा: खामगाव-शेगाव मार्गावरील सिद्धिविनायक कॉलेजजवळ घडलेल्या एका अपघातात केवळ एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला नाही, तर त्यापेक्षा अधिक खळबळजनक बाब म्हणजे अपघातग्रस्त कारमधून तब्बल 70 लाख 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून यासंदर्भात नागपूर आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.
अपघाताची घटना:
शेगाव तालुक्यातील लासुरा येथील सूरज साहेबराव बोदडे (वय: 25) हे दुचाकीवरून (एमएच-34 एपी-4511) खामगावकडे जात असताना, समोरून येणाऱ्या कारने (एमएच-21 डीएफ-3444) त्यांना धडक दिली. या अपघातात सूरज गंभीर जखमी झाले असून त्यांना खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढे उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले.
कारमध्ये रोख रक्कमचा सापडला खजिना:
अपघातानंतर शेगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारची झडती घेतली असता, त्यामध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली दोन पोती आढळून आली. रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी करून त्याचे छायाचित्रण करण्यात आले. ही रक्कम 70 लाखांहून अधिक असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक श्रेणिककुमार लोढा यांनी दिली.
संशयित ताब्यात, चौकशी सुरू:
या प्रकरणात कारमधील दोघे आरोपी भागवत ज्ञानदेव आडेकर आणि नरेश खंडेराव गाडे, हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. रोख रक्कम कुठून आणली? आणि कुठे नेत होते? याबाबत चौकशी सुरू असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
वाहन मालक व ई-रिकॉर्ड:
सदर कारचे ऑनलाइन रेकॉर्ड तपासल्यावर कार मालकाचे नाव शरद बागोरिया (रा. जालना) असल्याचे आढळून आले. या वाहनावर अतिवेगाने वाहन चालवल्याचे दोन दंड प्रलंबित असल्याचीही नोंद आहे.
या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम रस्त्यावर वाहतूक केली जात होती, याची पारदर्शक चौकशी होण्याची अपेक्षा आहे. पुढील तपास सुरू असून, यामध्ये अवैध आर्थिक व्यवहारांचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.