पुणे: राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याने आत्महत्या केली. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी निलेश चव्हाण फरार झाला.
आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर निलेशला नेपाळहून विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे. 31 मे रोजी सायंकाळपर्यंत आरोपी निलेशला न्यायालयात हजर केले जाईल. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी निलेश चव्हाणला न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा: नेपाळमधून निलेश चव्हाणला अखेर अटक; नेपाळला कसा पोहोचला?
विकृत निलेश चव्हाणचे काळे कारनामे:
आरोपी निलेश चव्हाणवर असा आरोप केला गेला आहे की त्याने स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह चित्रीकरण केले. इतकंच नाही, तर 2019 मध्ये त्याच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेशने त्याच्या बेडरूमच्या सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरा लावला होता. एवढंच नाही तर एसीलाही स्पाय कॅमेरा जोडलेला होता. या स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी निलेश चव्हाण शरीर संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. तसेच, निलेश इतर मुलींसोबतही शरीरसंबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता.
जेव्हा निलेशच्या बायकोला याची माहिती मिळाली, तेव्हा तिने निलेशला जाब विचारला. मात्र, पत्नीने जाब विचारताच निलेशने तिला चाकू दाखवून धमकावले आणि गळाही दाबला. निलेशच्या पत्नीने याबद्दलची माहिती निलेशच्या आई-वडिलांना दिली, तेव्हा निलेशच्या आई-वडिलांनी उलट तिचा छळ सुरू केला. निलेश चव्हाण हा करिष्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, निलेशचा बांधकाम व पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे.