Sunday, September 07, 2025 10:53:22 PM

Ayush Komkar: सुडाच्या भावनेतून आयुषला संपवलं, मामा वनराज आंदेकरचा खून कसा झाला?

गणेश कोमकरचा 19 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याची गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

ayush komkar  सुडाच्या भावनेतून आयुषला संपवलं मामा वनराज आंदेकरचा खून कसा झाला

पुणे: पुण्यातील नाना पेठ परिसरात गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोळीबार झाला. यानंतर पुन्हा एकदा टोळी युद्धाला तोंड फुटल्याचे बघायला मिळत आहे. गणेश कोमकरचा 19 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याची गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपींनी दुचाकीवरुन येत तीन गोळ्या झाडल्या आणि आयुषचा जीव घेतला. 

पुण्यात बंडू आंदेकर टोळीची मोठी दहशत आहे. 90 च्या दशकापासून ही टोळी कार्यरत आहे. बंडू आंदेकरला प्रमोद माळवदकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण तो शिक्षा भोगून बाहेर आला होता. बंडू आंदेकरची मुलगी संजीवनी ही जयंत कोमकरची पत्नी आणि हत्या झालेल्या आयुष कोमकरची काकी आहे. वनराज आंदेकर तिचा सख्खा भाऊ होता. 

वनराज आंदेकरचा खून झाला
मागच्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी पक्षाचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली. आंदेकर कुटुंब आणि कोमकर कुटुंबात एकेकाळी जवळचे संबंध होते परंतु संपत्तीच्या वादातून मतभेद वाढले आणि त्याला रक्तरंजित संघर्षाचे स्वरुप मिळाले.

हेही वाचा: मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज पाठवणारा अश्विनी कुमार कोण आहे?, जाणून घ्या..
वनराज आंदेकरचा काका माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते. मात्र मनपाने ते दुकान अतिक्रमण कारवाईत पाडले. या प्रकरणामागे नगरसेवक वनराज आंदेकर असल्याचा राग कोमकर कुटुंबाला होता. 

या घटनेमागे कौटुंबिक वादच नव्हता तर बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळी यांच्यातील वादही कारणीभूत होते. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखिल आखाडेवर हल्ला केला. या हल्ल्यात निखिलची हत्या झाली. यानंतर गायकवाड टोळीमध्ये बदल्याची आग तेवत होती. याच संधीचा फायदा घेत कोमकर गटाने वनराज आंदेकरच्या हत्येची सुपारी गायकवाड टोळीला दिल्याची चर्चा आहे. 

गणेश कोमकरवर वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोप आहे. त्यांचा बदला म्हणून गणेशचा मुलगा आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. यामुळे आंदेकर आणि कोमकर यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.  


सम्बन्धित सामग्री