beed crime News : बीडमध्ये महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल
बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हत्या, खंडणी, दरोडे, आणि टोळीयुद्ध यांसारख्या घटनांमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच दरम्यान आणखीन एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हा प्रकार एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेण्यात आलं होतं. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण पोलीसांनी हा प्रकार युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचं सांगून तक्रार पुढे ढकलली. एक महिना उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त झालेल्या पीडितेच्या आईने थेट पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला.
हेही वाचा - Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
बीडमध्ये मकोकाची कारवाई, तीन महिलांचा समावेश
बीडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या सुळसुळाटावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणानंतर जिल्ह्यातील वाल्मिक कराड टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीत दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे, मुद्दसर मन्सूर पठाण, सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या टोळीत तीन महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा - अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीने केला मर्चंट नेव्ही ऑफिसर पतीचा गेम
बीडमध्ये गुन्हेगारीत वाढ
ऊसतोडीच्या हंगामात बीड जिल्ह्यातून हजारो मजूर इतर जिल्ह्यांत जातात. या मजुरांना नेणाऱ्या मुकादमांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. महाराष्ट्रभर अशा प्रकारच्या सुमारे 2 हजार 500 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील तब्बल 90 टक्के गुन्हे हे बीड जिल्ह्यातील मुकादमांविरुद्ध आहेत.