पुणे: शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना, त्यांनी ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना भेटून घटनेची गंभीर दखल घेतली. त्यानंतर, त्यांनी या घटनेवर कारवाईचे संकेत दिले. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
'दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल घडलेल्या दुर्दैवी प्रकाराची माहिती मी आज भिसे कुटुंबीयांकडून घेतली आहे. त्यांच्या भावना ऐकताना त्यांच्या दुःखाची तीव्रता लक्षात आली. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवालानुसार आवश्यक ती कारवाई निश्चितच केली जाईल. कोणतीही दुर्लक्ष न करता, योग्य न्याय मिळावा यासाठी यंत्रणा सक्रिय राहील', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले, 'सध्या सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे या कुटुंबाच्या नवजात मुलींच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसूतीमुळे या दोन्ही मुलींची प्रकृती नाजूक असून त्यांना ‘एनआयसीयू’ (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये उपचार दिले जात आहेत. पुढील काही दिवस त्यांना तेथेच ठेवावे लागणार असून त्यांच्यावर विशेष वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अशा वेळी कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक तणाव ओढावलेला असतो.'
कुटुंबासाठी हा खर्च मोठा असून परवडण्यासारखा नाही:
'या उपचारांचा खर्च मोठा असून, सामान्य कुटुंबासाठी तो परवडण्यासारखा नाही. हे ओळखून, या दोन्ही अपत्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून भागवण्याचे निर्देश मी दिले आहेत. कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे या मुलींच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. या कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात शासन त्यांच्यासोबत आहे, असा विश्वास त्यांना वाटावा यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. समाजातील अशा घटना संवेदनशीलतेने हाताळल्या गेल्या पाहिजेत. प्रशासनाने तत्परतेने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून पावले उचलली पाहिजेत, हेच या प्रकरणातून अधोरेखित होते', असे त्यांनी माहिती दिली.