येवला: दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने येवल्यात नुकतेच मोटार चालित ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन मिळून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी काही प्रमाणात सुलभ होतील.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून व भुजबळ नॉलेज सिटीच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे अनेक दिव्यांग बांधवांना मोफत मोटार चालित ट्रायसायकल प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांगांच्या समस्यांविषयी सखोल चर्चा केली आणि त्यांना अधिक सहकार्य करण्याच्या प्रतिज्ञा घेतल्या.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून भाजप मंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण
कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या ट्रायसायकल अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांना स्वातंत्र्य, आत्मविश्वास व सक्षम भविष्यासाठी या वाहनांची मोठी मदत होईल.”
दिव्यांगांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत, मात्र त्यांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. अनेक लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आणि भविष्यात अधिक संधी मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.