मुंबई: बऱ्याच घटनांमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. याची प्रचित पुन्हा एकदा आली आहे. एकनाथ शिंदे यांना अपघात झाल्याचे दिसताच जखमी बाईकस्वाराला मदत केली आहे. तात्काळ ताफ्यातील अॅम्ब्युलन्स रुग्णासाठी दाखल करुन दिली. या अॅम्ब्युलन्सने जखमी बाईकस्वाराला रुग्णासयात दाखल करण्यात आले.
जखमी बाईकस्वाराच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विघ्नहर्ता ठरले आहेत. त्यांनी जखमी बाईकस्वाराला तात्काळ ताफ्यातील अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल केले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. घरोघरी गणेशाचे आगमन झाले असल्याने विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे. अशात जखमी तरुणाच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री शिंदे हेदेखील या तरुणासाठी खरे विघ्नहर्ता ठरले आहेत.
हेही वाचा: Vikhe Patil, Samant Meet Jarange: जरांगेंना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न; विखे-पाटील आणि मंत्री उदय सामंत चर्चा करणार
नेमकं काय घडलं?
आज सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय मात्र ठाणेकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आहे. बुधवारी सकाळी किसन नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे घरोघरी दीड दिवसांच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी शहरात फिरत होते. संध्याकाळी त्यांचा ताफा घोडबंदर रोडवर आला असता त्यांना एक तरुणाची बाईक घसरून रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवून गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. त्यावेळी या तरुणाने आपली दुचाकी घसरल्याने आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचे त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील अॅम्ब्युलन्स पुढे घेत या तरुणाला त्यात घालून त्याला तत्काळ घोडबंदर रोडवरील होरायझन प्राईम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. तसेच त्यांच्या ताफ्यातील एक अधिकारी देखरेख करण्यासाठी दिला.
शिंदेंनी आमदार बांगरांच्या आईसाठी अॅम्ब्युलन्स धाडली
काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या आईला हार्ट अटॅक आला. प्राथमिक उपचारादरम्यान त्यांच्या हृदयात तीन ब्लॉकेज असल्याचे सांगत त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी बांगर यांनी शिंदेंना फोन करताच त्यांनी एअर अॅम्ब्युलन्स बांगरांच्या आई वत्सलाबाईंसाठी पाठवली. तसेच स्वत: विमानतळावर त्यांनी भेटण्यासाठी गेले. यानंतर बांगर यांनी भावूक पोस्ट करत शिंदेंचे आभारही मानले होते.