Saturday, September 06, 2025 01:03:47 PM

Ganesh Visarjan 2025: नागपुरात बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप; महापालिकेकडून 216 ठिकाणी 419 कृत्रिम विसर्जन तलावांची उभारणी

शहरातील जलाशयांमध्ये विसर्जनास मनाई असल्याने, एनएमसीने एकूण 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलाव उभारले आहेत.

ganesh visarjan 2025 नागपुरात बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप महापालिकेकडून 216 ठिकाणी 419 कृत्रिम विसर्जन तलावांची उभारणी

Ganesh Visarjan 2025: 10 दिवस गणपतीची पूजा करून आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) भव्यतेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. 

शहरात 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलाव

शहरातील जलाशयांमध्ये विसर्जनास मनाई असल्याने, एनएमसीने एकूण 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलाव उभारले आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी विविध विसर्जन स्थळांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

मोठ्या मूर्तींसाठी विशेष व्यवस्था

मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलिस लाईन टाकळी आणि कच्ची विसा ग्राउंड येथे विशेष तलाव उभारले आहेत. गोरेवाडा तलाव 6 फूट किंवा त्याहून मोठ्या मूर्तींसाठी सज्ज आहे. तलाव 32 मीटर लांब, 18 मीटर रुंद आणि 6.5 मीटर खोल असून, प्रवेशासाठी 12 मीटर रुंद रस्ता आणि आपत्कालीन मार्ग देखील आहे.

हेही वाचा - Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनावेळी पुण्यातील मुख्य रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

दरम्यान, पोलिस लाईन टाकळी येथे 4 ते 6 फूट उंचीच्या मूर्तींचे, तर लकडगंजच्या कच्ची विसा ग्राउंडवर 5 फूट उंचीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी चार मोठ्या क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत.

विद्युत रोषणाई आणि सुरक्षा

सर्व विसर्जन तलावांवर विद्युत रोषणाईची सोय करण्यात आली आहे. आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे. दरम्यान, शहरातील प्रसिद्ध 'नागपूरचा राजा' गणेश मंडळात विसर्जनापूर्वी मंगल आरतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडत आहे. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात बाप्पाची आरती केली जात आहे. भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असून, सर्वत्र 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष घुमत आहे.

हेही वाचा - Pune Ganpati Visarjan Miravnuk 2025 : ढोलताशाच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात; पालखीत बाप्पा विराजमान

झोननिहाय कृत्रिम तलाव

लक्ष्मी नगर झोन – 20 ठिकाणे
धरमपेठ झोन – 24
हनुमान नगर झोन – 36
धंतोली झोन – 19
नेहरूनगर झोन – 30
गांधीबाग झोन – 28
सतरंजीपुरा झोन – 16
लकडगंज झोन – 19
आशी नगर झोन – 12
मंगळवारी झोन – 11
कोराडी – 1

याशिवाय, चिटणीस पार्क येथे 15 तलाव उभारण्यात आले आहेत, ज्यांना गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी, उल्हास, पेंच, भीमा, पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा अशा प्रमुख नद्यांची नावे देण्यात आली आहेत. नागपूर महापालिकेच्या या उपक्रमामुळे भाविकांना बाप्पाला निरोप देताना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहेत.


सम्बन्धित सामग्री