Saturday, September 06, 2025 01:06:45 PM

Maharashtra Maritime Territory: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चिनी जहाजांची धुडगूस; स्थानिक मच्छीमारांपुढे उपासमारीचा प्रश्न

चीनमधून तब्बल 500 ते 600 अवाढव्य फॅक्टरी जहाजे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीररित्या शिरून लाखो टन मासळीची लूट करीत असल्याचा गंभीर आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे.

maharashtra maritime territory महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चिनी जहाजांची धुडगूस स्थानिक मच्छीमारांपुढे उपासमारीचा प्रश्न

Maharashtra Maritime Territory: महाराष्ट्राचा सागरी किनारा हा देशातील सर्वात संपन्न आणि जैवविविधतेने नटलेला मानला जातो. कोकण पट्ट्यातील मच्छीमारांचे संपूर्ण आयुष्य या समुद्रावर अवलंबून असते. मात्र अलीकडच्या काळात परप्रांतीय आणि विदेशी मच्छीमार बोटींच्या वाढत्या घुसखोरीमुळे स्थानिक मच्छीमारांचे भविष्य धोक्यात आले आहे. नुकतीच समोर आलेली माहिती तर आणखी धक्कादायक आहे. चीनमधून तब्बल 500 ते 600 अवाढव्य फॅक्टरी जहाजे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीररित्या शिरून लाखो टन मासळीची लूट करीत असल्याचा गंभीर आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे.

मासेमारीवर मोठा परिणाम

गेल्या महिनाभरातच पावसाळी वादळे, खवळलेला समुद्र आणि हवामानातील बदल यामुळे स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करणे अवघड झाले होते. त्यातच चिनी व परप्रांतीय जहाजांची बेकायदेशीर घुसखोरी सुरू झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांतील शेकडो मोटरबोटी देखील महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करत असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा: RDX Mumbai Bomb Threat : मुंबई बॉम्बस्फोट धमकीप्रकरणातील आरोपी अटकेत, 400 किलो RDX लपवण्याचा रचला कट

अवाढव्य फॅक्टरी जहाजांची ताकद

चीनमधून आलेली ही जहाजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असतात. 50 ते 100 मीटर लांबीची ही जहाजे एकाच वेळी हजारो टन मासळी पकडू शकतात. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्याची सुविधाही असते. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासे अडकण्याआधीच हे जहाज समुद्र रिकामा करतात. याचा थेट फटका महाराष्ट्रातील कोकण आणि दक्षिण सागरी पट्ट्यातील छोट्या मच्छीमारांना बसतो.

सुरक्षेचे प्रश्न

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 200 नॉटिकल मैलाच्या आत अशी जहाजे आल्यास त्यांना शोधणे आणि थांबवणे हे मोठे आव्हान आहे. नौदल किंवा तटरक्षक दलाला ही जहाजे अचूक ओळखणे कठीण जाते. पकड झाली तरी ही जहाजे विविध कायदेशीर कारणे दाखवून सुटका करून घेतात, असा आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे.

संघटनांची नाराजी

वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी सांगितले की, 'चिनी जहाजे स्थलांतर करणारे मासे मोठ्या प्रमाणात पकडतात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या हाती रिकामी जाळीच उरते. सरकार आणि प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर महाराष्ट्रातील मासेमारी उद्योग पूर्णपणे कोलमडेल.'

त्याचप्रमाणे असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनीही याकडे लक्ष वेधले. 'व्हेसल ट्रॅकर सिस्टमवर या बोटींची हालचाल स्पष्टपणे दिसते. तरीदेखील कारवाई होत नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. दिवसेंदिवस परप्रांतीय बोटींची संख्या वाढत आहे,' असे ते म्हणाले.

हेही वाचा: Red Fort: लाल किल्ल्यातून हिऱ्यांनी जडवलेला सोन्याचा कलश चोरीला; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

स्थानिक मच्छीमारांचा आक्रोश

स्थानिक मच्छीमारांचा आरोप आहे की, प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही तर उद्या कोकण किनाऱ्यावरच्या हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह धोक्यात येईल. आधीच वाढते इंधनदर, हवामानातील बदल आणि मर्यादित मासेमारी हंगाम यामुळे त्यांचा खर्च वाढला आहे. त्यातच विदेशी जहाजांचा हा घातक हस्तक्षेप स्थानिक व्यवसाय संपवून टाकू शकतो.

 


सम्बन्धित सामग्री